पाकड्यांचा आडमुठेपणा, हिंदुस्थानी उच्चायुक्तांना गुरुद्वारात जाण्यापासून रोखले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकड्यांचा आडमुठेपणा पुन्हा एकदा समोर आला असून पाकिस्तानमधील हिंदुस्थानी उच्चायुक्त अजय बिसारिया यांना शनिवारी रावळपिंडीजवळील अबदल हसनमधील गुरुद्वारामध्ये दर्शनाला जाण्यापासून रोखण्यात आले. विशेष म्हणजे गुरुद्वारामध्ये जाण्यासाठीच्या सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्यानंतरही आपल्याला रोखण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा इस्लामाबादकडे मागे फिरावे लागले, असे बिसारिया यांनी सांगितले. बिसारिया हे आपल्या पत्नीसह येथे आले होते.

हिंदुस्थानने बिसारिया यांना गुरुद्वारामध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्याचा मुद्दा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयासमोर उपस्थित केला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना तीर्थक्षेत्रांवर जाण्यापासून रोखण्यात आल्याने कराराचे उल्लंघन होत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. शिखांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या या गुरुद्वारामध्ये आलेल्या भाविकांची भेट घेण्यासाठी बिसारिया जात असताना त्यांना रोखण्यात आले.

विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांमध्ये बिसारिया यांना गुरुद्वारामध्ये आलेल्या भाविकांची भेट घेण्यापासून रोखण्यात आल्याची ही दुसरी घटना आहे.एप्रिलमध्येही हिंदुस्थानी यात्रेकरुंची भेट घेण्यापासून बिसारिया यांनी रोखण्यात आल्याने त्यांना इस्लामाबादला परतावे लागले होते. त्यावेळी हिंदुस्थाने पाकिस्तानच्या या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला होता. खलिस्तान आंदोलनाला शिखांचा पाठिंबा मिळावा यासाठी पाकिस्तानचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात आणि त्यातूनच पाकिस्तानकडून अशा प्रकारचे कृत्य करण्यात येते.

हिंदुस्थान आणि पाकिस्तामध्ये झालेल्या १९७४ च्या विशेष करारानुसार दोन्ही देशातील नागरिकांना तीर्थक्षेत्राला जाण्याची संमती देण्यात येते. याच करारानुसार हिंदुस्थानातील शेकडो शीख प्रत्येक वर्षी पाकिस्तानमधील पवित्र गुरुद्वारा, तीर्थक्षेत्र आणि धार्मिक सणांना जातात.