हिंदुस्थानी मालिका बघून आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होतोय! पाकिस्तानचा ‘कॉमेडी शो’


सामना ऑनलाईन। लाहोर

हिंदुस्थानी टीव्ही मालिका बघून पाकिस्तानी संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. यामुळे न्यायालय पाकिस्तानच्या वाहिन्यांवर हिंदुस्थानी मालिका दाखवण्याची परवानगी देणार नाही, असा निर्णय पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी दिला आहे.

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलरिटी अथॉरिटी(pemra) तर्फे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. पाकिस्तानमध्ये हिंदुस्थानी वाहिन्यांवरील मालिकांवर बंदी घालण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला pemraने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सरन्यायाधीश शाकिब निसार यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठाने सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत पाकिस्तानमध्ये हिंदुस्थानी मालिका दाखवण्याची परवानगी नाकारली.

यावेळी pemraचे अध्यक्ष सलीम बेग यांनी Filmazia या वाहिनीवर दाखवण्यात येणारे 65 टक्के कार्यक्रम परदेशी असून त्यांचा आकडा आता 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. असे सांगितले. यावर सरन्यायाधीशांनी यापुढे पाकिस्तानी वाहिन्यांवर हिंदुस्थानी मालिका दाखवण्याची परवानगी नाकारली. हिंदुस्थानी मालिका आपल्या संस्कृतीच्या विरोधात असून त्यामुळे आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होत आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

pemraने 2016 साली हिंदु्स्थानी मालिकांच्या पाकिस्तानमधील सर्व वाहिन्यांवर व रेडीओवर प्रदर्शित होण्यावर बंदी घालण्यास सांगितले होते. कारण त्यावेळी हिंदुस्थानच्या काही वाहिन्यांनीही पाकिस्तानी कार्यक्रमावर बंदी घातली होती.