पाकड्यांचे शेपूट वाकडेच; आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय मान्य नाही

सामना ऑनलाईन । हेग

आंतरराष्ट्रीय कोर्टाने मुस्काटले तरीही पाकिस्तानचे मात्र शेपूट वाकडेच आहे. या कोर्टाचा निर्णय आम्ही मान्य करणार नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय बंधनकारक असू शकत नाही असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झाकारिया यांनी सांगितले. हिंदुस्थान आपला खरा चेहरा लपवीत आहे अशी बोंब त्यांनी मारली.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा पाकिस्तानला झटका

 

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला जबरदस्त झटका दिला असून हिंदुस्थानचे निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीला अंतरिम स्थगिती दिली आहे. आमचा निर्णय पाळावाच लागेल असे बजावताना न्यायालयाने पाकडय़ांच्या खोटय़ा दाव्यांच्या अक्षरशः चिंधडय़ा उडविल्या. जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्यात येत असून अंतिम निर्णय हे कोर्ट देईपर्यंत फाशीची शिक्षा देता येणार नाही, असे न्यायालयाने बजावले आहे. दरम्यान, जाधव यांच्या फाशीला स्थगिती मिळाल्यामुळे हिंदुस्थानात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

जाधव यांच्या फाशीविरुद्ध हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली आहे. ९ मे रोजी कोर्टाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली होती. त्यानंतर मंगळवारी हिंदुस्थानची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी पाकिस्तानचा बुरखा फाडला होता. दोन्ही देशांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर नेदरलॅण्डच्या हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय आज निर्णय देणार होते. या निर्णयाकडे अवघ्या हिंदुस्थानसह जगाचे लक्ष लागले होते. हिंदुस्थानी वेळेप्रमाणे दुपारी ३.३० च्या सुमारास चीफ जस्टिस रोनी अब्राहम यांच्या नेतृत्वाखाली ११ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने कामकाज सुरू केले. चीफ जस्टिस रोनी अब्राहम यांनी आपल्या निकालपत्राचे ४० मिनिटे वाचन केले. पाकिस्तानचा प्रत्येक दावा खोटा असल्याचे स्पष्ट करून जाधव यांच्या फाशीला अंतरिम स्थगिती त्यांनी दिली. ऑगस्टमध्ये न्यायालयात अंतिम निर्णय लागण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानांकडून सुषमा स्वराज यांचे अभिनंदन

जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले.

पाकड्यांचे दावे, पुराव्यांची चिरफाड

> चीफ जस्टिस अब्राहम यांनी सर्वप्रथम दोन्ही देशांकडून मंगळवारी मांडण्यात आलेल्या युक्तिवादाचा संक्षेप वाचून दाखवला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल ऑर्डर ऑफ मेरिटच्या तत्त्वावर दिला जाईल असे स्पष्टपणे सांगितले.

> कुलभूषण जाधव हिंदुस्थानी नागरिक आहेत हे दोन्ही देश मान्य करतात. तसेच १९७७ च्या व्हिएन्ना करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱया केल्या आहेत. त्यामुळे या कराराचे पालन करणे दोघांनाही बंधनकारक आहे. या कराराचा पाकिस्तानने भंग केल्याचे या प्रकरणात स्पष्ट दिसते.

> जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी अटक केल्याचा पाकचा दावा आहे. परंतु अटक कशी केली, खटला कसा चालवला याची माहिती हिंदुस्थानला दिली नव्हती.

> जाधव यांनी कबुलीजबाब दिल्याचा व्हिडीओ बनावट असल्याचे अब्राहम यांनी स्पष्ट केले.

> जाधव यांना आपला बचाव करण्याचा अधिकार आहे. त्यांना वकिलांमार्फत म्हणणे मांडण्याचा अधिकार असताना पाकने का खटल्याची घाई केली?

> जाधव यांना भेटू द्या अशी मागणी हिंदुस्थानने १६ वेळा केली, पण ही मागणी मान्य केली गेली नाही. कागदपत्रेही दिली नाहीत.

> जाधव यांना पाकडे कधीही फाशी देऊ शकतात अशी भीती साळवे यांनी मंगळवारी युक्तिवादावेळी केली होती. ही भीती खरी असल्याचे चीफ जस्टिस अब्राहम म्हणाले.

> जाधव यांना दयेचा अर्ज करण्याचा अधिकार आहे.

> जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्यात येत असून अंतिम निर्णय हे कोर्ट देईपर्यंत फाशीची शिक्षा देता येणार नाही.

> आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय पाकिस्तानला मान्य करावाच लागेल. नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील.

 

पाकचे १८ वर्षांनंतर पुन्हा वस्त्रहरण

आंतरराष्ट्रीय न्यायालयात १८ वर्षांनंतर पुन्हा पाकचे वस्त्रहरण झाले आहे. कच्छमध्ये नौदलाचे विमान हिंदुस्थानने पाडले. त्यात १६ कर्मचारी ठार झाले असा दावा करीत पाकने आंतरराष्ट्रीय न्यायालयात २००० मध्ये धाव घेतली होती, मात्र पाकडय़ांचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला होता. आता दुसऱ्यांदा पाकचा पराभव झाला आहे.

हरीश साळवेंचे सर्वत्र कौतुक

जगभरात पाकिस्तानची नाचक्की करण्यामागे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. साळवे यांनी जबरदस्त युक्तिवाद केल्यामुळे कुलभूषण जाधव यांची बाजू मजबूत असल्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या लक्षात आले. केवळ एक रुपया फी घेऊन हिंदुस्थानच्या वतीने साळवे यांनी भूमिका मांडली. त्यांचे सर्वच मुद्दे न्यायालयाने मान्य केले. जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्याचे वृत्त येताच देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून साळवे यांचे अभिनंदन केले आहे.