पाकिस्तानची विक्रमी सलामी, ३०४ धावांची भागीदारी 

झमानचे वन डेत द्विशतक

सामना ऑनलाईन,  बुलावायो

झिम्बाब्वेविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील चौथ्या सामन्यात शुक्रवारी पाकिस्तानचा सलामीकीवीर फखर झमानने कारकीर्दीतील पहिले द्विशतक ठोकले. अशी कामगिरी करणारा तो पहिला पाकिस्तानी फलंदाज ठरला  हे विशेष. त्याने २१० धावांच्या नाबाद खेळीत १५६ चेंडूंना सामोरे जाताना २४ चौकार आणि ५ षटकार लगावले.

झमानने या द्विशतकी खेळीत हिंदुस्थानचा सलामीवीर रोहित शर्माचे तीनपैकी दोन विक्रम मोडीत काढले. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत तीन केळा द्विशतक झळकाकले असून त्यापैकी दोन वेळा २०८ व २०९ धावा केल्या होत्या. हे दोन विक्रम  झमानने मोडले, मात्र सार्वधिक २६४ धावांचा रोहितचा विक्रम  अबाधित राहिला. याशिवाय २१९ धावांच्या वीरेंद्र सेहवागच्या विक्रमापर्यंतही इमान पोहोचू शकला नाही. मात्र पाकिस्तानच्या सईद अन्वरचा २१ वर्षांपूर्वीचा १९४ धावांचा विक्रमही इमानने मोडला. सईद अन्वरने १९९७ मध्ये हिंदुस्थानविरुद्ध चेन्नईत १९४ धावांची खेळी केली होती.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम सलामीचा नवा विश्वविक्रम केला. इमाम उल हक आणि फखर झमान यांनी पहिल्या गड्यासाठी ३०४ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमध्ये इमाम उल हकने ११३ धावांचे योगदान दिले, तर झमानने १६९ धावा केल्या. ४२ षटकांत पाकिस्तानच्या सलामीवीरांनी ३०४ धावा फटकाविल्या. इमाम उल हकने आपल्या खेळीत १२२ चेंडूंत ११३ धावा करत ८ चौकार ठोकले. या दोघांनी श्रीलंकेच्या उपुल थरंगा आणि सनथ जयसूर्या यांचा २८६ धावांच्या भागीदारीचा विक्रम  मोडीत काढला. झमानच्या नाबाद २१० आणि इमामाच्या ११३ धावांबरोबरच असिफ अली यानेही धडाकेबाज कामगिरी केली. त्याने २२ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकार खेचत नाबाद अर्धशतक (५०) केल्याने पाकिस्तानने १ बाद ३९९ धावांचा डोंगर उभारला.