जाधव प्रकरणी पाकड्यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयात पुनर्विचार याचिका

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. जाधव यांच्या प्रकरणावर सहा आठवड्यांत सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. गुरुवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्याचा आदेश पाकिस्तानला दिला होता.

हेरगिरीच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानने सुनावलेल्या शिक्षेविरोधात हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. त्याठिकाणी हिंदुस्थान आणि पाकिस्तानची बाजू ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने हिंदुस्थानच्या बाजूने निर्णय देत जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयाला पाकिस्तानने पुन्हा आव्हान देिले आहे. यासाठी पाकिस्तानकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे, असे वृत्त पाकिस्तानच्या ‘दुनिया न्यूज’ न्यूज पोर्टलने दिले आहे. तसेच आपली बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी पाकिस्तानने नवी टीम बनवल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

कोण आहेत कुलभूषण जाधव?

कुलभूषण जाधव (४६) यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावण्यात आला होता. मागिल वर्षी ३ मार्च २०१६मध्ये जाधव यांना बलुचिस्तान प्रांतात अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या ते मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलीस दलाचे माजी कर्मचारी आहेत. जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती.