कश्मिरी विद्यार्थ्यांना पाकिस्तानकडून स्कॉलरशीप

सामना ऑनलाईन। श्रीनगर

पाकिस्तानमध्ये इंजीनियरिंग आणि मेडीकलचे शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कश्मिरी विद्यार्थी जात असून या विद्यार्थ्यांना पाकिस्तान स्कॉलरशिप देत आहे. यासाठी कश्मीर मधील फुटीरतावादी विद्यार्थ्यांना मदत करत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी दहशतवादी व फुटीरतावाद्यांचे नातेवाईक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दिल्लीतील एका न्यायालयात दहशतवाद्याना फंडींग पुरवल्याप्रकरणी एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. यात ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून कश्मिरी तरुणांचे पाकिस्तानमध्ये जाऊन इंजीनियरिंग व मेडीकल करण्याचे प्रमाण वाढले आहे. या विद्यार्थ्यांना व्हिसा मिळवून देण्यासाठी कश्मीरमधील फुटीरतावादी नेते पाकिस्तानच्या उच्च आयोगाला शिफारस पत्र पाठवत असल्याचे या आरोपपत्रात सांगण्यात आले आहे. यात हुर्रियत नेता सय्यद अली शाह गिलानी याच्याबरोबरच दुसऱ्या एका फुटीरतावाद्याचा समावेश आहे. असे एनआयएने म्हटले आहे. तसेच अशाप्रकारे हिंदुस्थान विरोधात पाकिस्तान सर्मथक डॉक्टर व इंजीनियरिंगची फौज तयार केली जात असल्याचा दावा एनआयएने केला आहे.