अमित शहांच्या कारवाईमुळे आयएसआयला धडकी; हिंदुस्थानची मोहीम सुरुच राहणार

113

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दहशतवादाविरोधातील कारवाईमुळे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला (आयएसआय) धडकी भरली आहे. शहा यांनी जम्मू कश्मीरवर लक्ष केंद्रीत करत दहशतवाद्यांच्या समूळ उच्चाटनासाठी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना गुप्तपणे मदत करण्यासाठी आयएसआयने कश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांचा नवा गट स्थापन केल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे. कश्मीरमधील फुटीरतावाद्यांच्या मदतीने आयएसआयने हा गट स्थापन केला आहे.

या गटाचा म्होरक्या म्हणून इरशाद अहमद मलीक याची नियुक्ती करण्यात आली आहे. इरशाद हा लश्कर या दहशतवादी संघटनेत सहभागी होता. त्याचे लश्करशी संबंध आहेत. फुटीरतावाद्यांच्या या नव्या गटात लश्करच्या दहशतवाद्यांनाही सहभागी करण्यात आले आहे. या गटाकडे जम्मू आणि कश्मीरमध्ये सुरक्षा दलाविरोधात घातपात आणि अशांतता पसरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर कश्मीरवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांनी सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांची आणि राज्यपाल सत्यपाल मलीक यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई सुरुच ठेवण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार सुरक्षा दलाने ऑपरेशन ऑल आऊटला वेग दिला आहे.

एनआयएसह इतर तपास यंत्रणांनीही कश्मीरमधील भ्रष्टाचार, फुटारतावाद्यांच्या कारवाया आणि टेरर फंडींगच्या तपासाला वेग दिला आहे. या कारवाईमुळे दहशतवादी बिथरले आहेत. या कारवाईमुळे दहशतवाद्यांना पाठबळ देणारी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयलाही धडकी भरली आहे. त्यामुळे आयएसआयने फुटीरतावाद्यांच्या मदतीने कश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांचा नवा गट स्थापन केला आहे. याची माहिती मिळाल्यानंतर एनआयएने मर्सरत आलम, शब्बीर शाह, आसिया अंद्राबी यासारख्या फुटीरतावादी नेत्यांना अटक करून तुरुंगात डांबले आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. सुरक्षा दलाने ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत या वर्षात 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यात लश्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजहिद्दीनचे सर्वाधिक दहशतवादी आहेत. तसेच दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय असणाऱ्या जाकीर मुसाचाही सुरक्षा दलाने खात्मा केल्याने दहशतवाद्यांसह आयएसआयही बिथरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या