हिंदुस्थानला आवरा….पाकड्यांची संयुक्त राष्ट्रांकडे गयावया

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात उघडउघड कारवाई करण्याचे संकेत दिल्याने टरकलेल्या पाकड्यांनी मदतीसाठी संयुक्त राष्ट्रांनाच साकडे घातले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्रांचे  महासचिव अंतोनियो गुतेरेस यांना पत्र लिहलं असून त्यात पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थान दोन्ही देशांमध्ये उगाच तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा खोटारडेपणा करत गळा काढला आहे. पाकड्यांनी हिंदुस्थानला ‘प्लीज आवरा’ असं म्हणत संयुक्त राष्ट्रांसमोर गयावया केली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी हिंदुस्थानमध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदूची मते मिळवण्यासाठी नवीन खेळी करू शकतात . लोकांना पाकिस्तानविरोधात भडकवू शकतात असा आरोप केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा पाकड्यांनी हिंदुस्थानविरोधात खोटे आरोप करायला सुरूवात केली आहे. पाकड्यांनी लिहलेल्या पत्रात म्हटलंय की “हिंदुस्थान पुलवामा हल्ल्यानंतर मुद्दाम तणावाचे वातावरण निर्माण करत आहे. प्रत्येक हल्ल्याप्रमाणेच याही हल्ल्यासाठी हिंदुस्थान पाकिस्तानलाच जबाबदार ठरवत आहे. जर पुलवामा ह्ल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध आहे असे हिंदुस्थानला वाटत असेल तर मग त्यांनी आधी त्याचे पुरावे सादर करावे. जेणेकरून आम्ही निष्पक्ष तपास करू शकू.” हिंदुस्थानला तणाव निर्माण न करण्याच्या सूचना देण्यात याव्यात असे म्हणत पाकड्यांनी संयुक्त राष्ट्रांपुढे लोटांगण घातले आहे.

14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील अवंतीपुरा येथून जाणाऱ्या सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. यात 40 जवान शहीद झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे हिंदु्स्थानमध्ये पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली असून पाकड्यांना धडा शिकवा अशी मागणी जनता करत आहे. पाकिस्तानबरोबर खुले युद्ध करण्याऐवजी मोदी सरकारने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. तसेच पाकिस्तानबरोबरचे व्यापारी निर्बंध प्रचंड कडक केले आहे. यामुळे कंगाल झालेल्या पाकिस्ताननची आणखीनच वाट लागली आहे. यामुळे टरकलेल्या पाकड्यांनी हिंदुस्थानवरच खोटे आरोप करत संयुक्त राष्ट्रांना मदतीसाठी साकडे घातले आहे.