‘पाकिस्तान मेड’ २ हजारांच्या बनावट नोटा हिंदुस्थानात

नवी दिल्ली – ‘नोटाबंदी’ करून पाकिस्तानचे बनावट नोटांचे रॅकेट पुरते उद्ध्वस्त करून टाकले या मोदी सरकारच्या दाव्याच्या साफ ठिकऱया उडाल्या आहेत. पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तचर संस्थेने छापलेल्या दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणात दाखल झाल्या आहेत.

विशेष म्हणजे केंद्र सरकारने चलनात आणलेल्या दोन हजारांच्या नव्या नोटांवरील १७ पैकी ११ सिक्युरिटी फिचर्सची हुबेहूब नक्कल पाकिस्तानने केली आहे. त्यामुळे कोणती दोन हजारांची नोट खरी आणि कोणती खोटी यातला फरकच लक्षात येईनासा झाला आहे. त्यामुळे ‘पाकिस्तान मेड’ दोन हजारांच्या बनावट नोटा रोखण्याचे मोठे आव्हान मोदी सरकारपुढे आता उभे ठाकले आहे.

स्वच्छ अर्थव्यवस्थेच्या इराद्यांना सुरुंग

मोदी सरकारने ‘नोटाबंदी’ म्हणजे काळा पैसा, बनावट नोटा आणि दहशतवादावर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’च आहे असे ढोल केंद्रीय मंत्र्यांनी आणि भाजप नेत्यांनी पिटले होते. पण नोटाबंदीनंतर ९० दिवसांच्या आत हिंदुस्थानच्या स्वच्छ अर्थव्यवस्थेच्या इराद्यांना सुरुंग लावण्यात ‘आयएसआय’ सफल ठरली आहे.

बनावट नोट बांगलादेशात ४०० ते ६०० रुपयांत

पाकिस्तानच्या आयएसआयने छापलेली दोन हजारांची बनावट नोट बांगलादेशात ४०० ते ६०० रुपयांत मिळते. हिंदुस्थानच्या चलनात ती मिसळण्याचे काम मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. या बनावट नोटांचा कागद आणि छपाईचा दर्जा हिंदुस्थानातील दोन हजारांच्या अस्सल नोटांच्या तुलनेत थोडासा निकृष्ट आहे इतकेच.

दोन हजारांच्या बनावट नोटांवरील अशोकचिन्ह, वॉटर मार्क, पारदर्शक भाग, गव्हर्नरांच्या स्वाक्षरीचे हमीपत्र, २००० हे मूल्य, चांद्रयानाचे छायाचित्र, ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचे बोधचिन्ह या सगळय़ा वैशिष्टय़ांची हुबेहूब नक्कल करण्यात आली.

अर्थखात्याचा, रिझर्व्ह बँकेचा दावा फोल

दोन हजारांच्या बनावट नोटा पाकिस्तानातून बांगलादेशमार्गे मोठय़ा प्रमाणात येऊ लागल्याचे उघड झाले आहे. अझिझूर रेहमान या इसमाला ८ फेब्रुवारीला मुर्शिदाबाद येथे पकडण्यात आले. त्याच्याकडे दोन हजार रुपयांच्या 40 बनावट नोटा सापडल्या. त्यांची छपाई पाकिस्तानात झाली असून बांगलादेशच्या सीमेवरून तस्करी करून आपण त्या हिंदुस्थानात आणल्या अशी कबुली रेहमान याने दिली आहे. त्यामुळे दोन हजारांच्या नव्या नोटेची नक्कल करणे कठीणच आहे हा अर्थखात्याचा आणि रिझर्व्ह बँकेचा दावा फोल ठरला आहे.

दीड महिन्यात चार कोटींच्या बनावट नोटा

गेल्या दीड महिन्यात बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सीमेवरून बनावट नोटांची तस्करी करणाऱया 42 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ कोटी ९६ लाख ७२ हजार किमतीच्या दोन हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या नव्या नोटांचीही नक्कल आयएसआयने केल्याचे निदर्शनास आल्यानंतर बनावट नोटा पकडण्याची मोहीम १५ डिसेंबरपासून सुरू झाली आहे.