बालाकोटचा धसका पाकिस्तानने बंद केले 11 दहशतवादी तळ

59

सामना ऑनलाईन। इस्लामाबाद

हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्याचा धसका घेतला असून पाकिस्तानमधील तब्बल 11 दहशतवादी तळ बंद केले आहेत. हिंदुस्थानने हवाई हल्ला करण्याआधी आणि नंतरही कुटनीतीचा वापर करून पाकिस्तान दहशतवादी तळ चालवत असल्याचे पुरावे आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडले आणि पाकिस्तानला उघडे पाडले. त्यामुळे बालाकोटसारख्या हवाई हल्ल्याची भीती आणि आंतरराष्ट्रीय दबाव या कोंडीमुळे पाकिस्तानला तळ बंद करण्याशिवाय काही पर्याय उरला नाही.

मुझफ्फराबाद आणि कोटलीमध्ये प्रत्येकी 5 असे दहा तळ आणि बर्नालामध्ये एक असे एकूण 11 तळ पाकिस्तान लष्कराच्या मदतीने सुरू होते. याचे पुरावे हिंदुस्थानने सादर केले होते. पुराव्यानंतर कोटली आणि निकियल भागात सुरू असलेले लष्कर ए तोयबाचे दहशतवादी तळ बंद करण्यात आले. पाला, बाघ, मुझफ्फराबाद आणि मीरपूरमधील भागात जैश ए मोहम्मदकडून चालवले जाणारे तळही बंद करण्यात आले आहेत.

लष्कर, जैश, हिजबुलचे तळ बंद
हिंदुस्थानमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानने ‘लष्कर -ए-तोयबा’, ‘जैश ए मोहम्मद’ आणि ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनांना तळ उभारून दिले होते. पाकिस्तान लष्कराच्या मदतीने उभारण्यात आलेल्या या तळांवर सर्व सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. हिंदुस्थानी सीमेत घुसखोरीसाठी आणि घातपात घडवण्यासाठी सर्वतोपरी रसद पाकिस्तान लष्कर तळांवर दहशतवाद्यांना पुरवत होते.

आपली प्रतिक्रिया द्या