ड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार

सामना ऑनलाईन। इस्लामाबाद

पुलवामा हल्ल्यानंतर वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकड्यांची झोप उडाली आहे. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. मसूद अजहर हा या संघटनेचा म्होरक्या असून तो पाकिस्तानातच राहतो. त्याचं कार्यालय ज्या भागात आहे त्याला पाकिस्तानी सैनिकांनी घेराबंदी केली आहे. या कार्यालयात काय चालतं हे दाखवण्यासाठी पाकिस्तानने माध्यमांना तिथे नेण्याचं ठरवलं आहे. माध्यमांचा खांदा वापरत ते हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत की जैश-ए-मोहम्मदच्या कार्यालयात दहशतवादाला प्रोत्साहन मिळेल असं काहीच कृत्य केलं जात नाही.

पुलवामा हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर टीका करण्यात येत आहे. अमेरिका, चीन, जर्मनी, फ्रान्स, रशियासह दक्षिण कोरिया व इतर अनेक देशांनी दहशतवादविरोधात हिंदुस्थानसोबत असल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाकिस्तानची आर्थिक मदत पूर्वीच थांबवली आहे. यामुळे भिकेला लागलेल्या पाकिस्तानची आपण कसे नापाक आहोत हे जगाला दाखवण्यासाठी पळापळ सुरू झाली आहे.

हिंदुस्थाननेही पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याचे संकेत दिल्याने पाकड्यांची पुरती गोची झाली आहे. हिंदुस्थान कुठल्याही क्षणी हल्ला करेल या भीतीने ग्रासलेल्या पाकिस्तानने जैशच्या दहशतवाद्यांना व नागरिकांना बंकर्समध्ये हलवण्यास सुरुवात केली आहे. तसेच दुसरीकडे हिंदुस्थानमधील कुठल्याही दहशतवादी हल्ल्यांशी आमचा संबंध नाही असा दावा करत पाकिस्तानने आता जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयात दहशतवादी नाही तर गरजूंना मदत करण्याचे कार्य केले जाते. असे जगाला दाखवण्यासाठी नवी क्लृप्ती लढवत मीडियालाच जैश च्या मुख्यालयात नेण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील प्रशासन शनिवारी मीडियावाल्यांना या मुख्यालयात नेणार आहे. पंजाब प्रांतातील बहावलपूर येथे एका मशिदीला मसूद अजहरने जैशचे मुख्यालय बनवले असून येथील मदरशामध्ये 700 गरजू विद्यार्थ्यांना शिकवले जाते असा पाकिस्तानचा दावा आहे.