नवाझ यांना ते ‘शरीफ’ असल्याचं सिद्ध करावं लागणार

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरूद्ध पनामागेट प्रकरणी लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी संयुक्त तपास पथक नेमण्याचे तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. २०१८ मध्ये होणाऱ्या निवडणुकांपूर्वी शरीफ यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण या तपास पथकाला त्यांची चौकशी ६० दिवसांमध्ये पूर्ण करायची आहे.

१९९० च्या दशकामध्ये नवाझ शरीफ यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आणि हा काळा पैसा त्यांनी स्वत:च्या आणि मुलांच्या नावाने लंडनमध्ये मालमत्ता विकत घेण्यासाठी वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पनामामधील मोसाक फोंसेका कंपनीची गुप्त कागदपत्र २०१६ साली लीक करण्यात आली होती. या कागदपत्रांमध्ये अनेक देशांचे प्रमुख नेते, अधिकारी, कलाकार आणि खेळाडूंच्या काळ्या पैशाची माहिती जगासमोर आली होती. ज्यामध्ये शरीफ यांचेही नाव आहे. शरीफ यांनी त्यांची मुलं मरीयम, हसन आणि हुसैन यांची ज्या विदेशी कंपनीत भागीदारी आहे, त्या विदेशी कंपनीच्या मार्फत लंडनमध्ये मालमत्ता विकत घेतल्याचं याच कागदपत्रांमुळे उघडकीस आलं होतं.