पाकिस्तान जिंकला, पण कौतुक विराटचं

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘हार कर जितने वाले को बाजीगर कहते है।’ अशीच काहीशी स्थिती सध्या हिंदुस्थानचा संघ आणि कर्णधार विराट कोहलीची आहे. ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’च्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानला पाकिस्तानकडून दारुण पराभव पत्करावा लागला. मात्र असं असलं तरी, हिंदुस्थानी संघाच्या कर्णधारानं सामन्यानंतर दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे पाकिस्तानी चाहते भलतेच खूष झाले आहेत.

सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला होता, ‘मी पाकिस्तानला शुभेच्छा देऊ इच्छितो ही मालिका त्यांच्यासाठी चांगली ठरली. त्यांनी ज्या प्रकारे चांगला खेळ करत सर्व परिस्थिती आपल्या काबूत केली, ते पाहाता या संघात अत्यंत उत्कृष्ट खेळाडू आहेत हे स्पष्ट होतं. त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे की ते कोणत्याही दिवशी ते कोणाचीही शिकार करू शकतात (हरवू शकतात). आम्ही निराश होणं हे स्वाभाविक आहे, पण तरीही माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे, कारण आम्ही उत्तम खेळ करत अंतिम फेरी गाठली’.

विराटच्या या पत्रकार परिषदेतील विधानांवर पाकिस्तानी चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मुबाशेर लुकमन यांनी लिहलयं की, ‘कोहलीनं सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीबद्दल धन्यवाद. तू अनेकांचं हृदय जिंकलंस. तू महान खेळाडू आहे आणि चांगला माणूसही’. तर अन्य एका चाहत्यानं म्हटलयं, ‘तुझं भाषण खरचं छान होतं. हिंदुस्थानचा संघ खरच चांगला आहे.’ मुशर्रफ झैदी लिहितात की, ‘विराट कोहलीच्या मुलाखतीतून खिलाडू वृत्ती दिसली’.