बीटींग द रिट्रीट सेरेमनी दरम्यान पाकिस्तानी सैनिक आपटला

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवरील वाघा व पंजाबातील हुसैनीवाला सीमेवर दररोज होणाऱ्या बीटींग द रिट्रीट सेरेमनीला विशेष महत्त्व आहे. दोन्ही देशांसाठी ही परेड फार मानाची समजली असते. दोन्ही देशांचे जवान या परेडमधून देशाबद्दल असलेला जोश व प्रेम व्यक्त करत असतात. पण पाकिस्तानच्या एका अतिउत्साही सैनिकाच्या फुकटच्या जोशामुळे दोन्ही देशातील जनतेच्या समोर पाकिस्तानचे हसे झाले आहे. परेड सुरू असताना अतिउत्साहाच्या भरात या सैनिकाने जमिनीवर इतक्या जोरात पाय आपटला की त्याचा तोल जाऊन तो चक्क खालीच पडला. यामुळे पाकिस्तानची पुरती फजिती झाली तर हिंदुस्थानी नागरिकांनी मात्र या घटनेचा मनसोक्त आनंद घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल साईटवर व्हायरल झाला असून त्यावर अनेक विनोद केले जात आहेत.

बीटींग द रिट्रीट सेरेमनीमध्ये बीएसएफचे जवान व पाकिस्तानी सैनिक आपआपल्या देशाबद्दल अभिमान व्यक्त करताना जोशपूर्ण परेड करतात. यात दोन्ही जवान परेड करताना पाय आपटून समोरच्याला कमी लेखण्याचा त्याच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. ही टशन बघण्यासाठी दोन्ही देशातील नागरिक मोठ्या संख्येने दररोज सीमेवर येत असतात. देशातील नागरिकांमध्ये देशप्रेम निर्माण करणे हा देखील या परेडमागचा उद्देश असतो. पण पाकिस्तानच्या एका सैनिकाने जोरात पाय आपटून परेडचा पार विचकाच केला. हुसैनीवाला सीमेवर बीटींग द रिट्रीट सेरेमनीमध्ये अतिजोशात पाय आपटल्याने त्याचा तोल गेला आणि तो जमिनीवर आपटला. पाकिस्तानी सैनिकाची झालेली फजिती बघून हिंदुस्थानी नागरिकांमध्ये एकच हशा पिकला. तर पाकड्यांची मात्र चांगलीच गोची झाली. परेड बघायला आलेल्या एका हिंदुस्थानी नागरिकाने या घटनेचा व्हिडिओ काढला व सोशल साईटवर टाकला.