इम्रान खान पंतप्रधान होताच सीमेवरील हालचाली वाढल्या, शस्त्रसाठ्याची जमवाजमव

सामना ऑनलाईन। जैसलमेर

राजस्थानमधील जैसलमेर आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानच्या संशयास्पद हालाचाली वाढल्या आहेत. या भागात पाकिस्तानी लष्कराचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. तसेच पाकिस्तानी सैनिकांची कुमकही वाढवण्यात आली आहे. तसेच या भागात पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठ्याची जमवाजमव करण्यास सुरुवात झाली आहे. इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही देशातील संबंध सुधारण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, ते लष्कराच्या तालावर हालचाली करत असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानच्या या हालचालींमुळे हिंदुस्थानचे जवान सर्तक झाले असून बीएसएफला सर्तकतेचे आदेश देण्यात आले आहेत.

या भागात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू शोधण्याच्या नावाखाली पाकिस्तान कूटकारस्थान करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या शोधासाठी चीनच्या अभियंत्यांची मदत घेण्यात येत आहे. त्यामुळे चीनचे अधिकारी आणि सैनिकांचीही या भागात संचार आहे. पाकिस्तानच्या या हालचालींमुळे हिंदुस्थानी सैन्य सतर्क झाले असून पाकिस्तानच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. पाकिस्तानकडून असलेला धोका लक्षात घेता या भागात सैनिकांची गस्त वाढवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणाकडून ही माहिती गृहमंत्रालयाला देण्यात आली आहे. त्यानंतर गुप्तचर विभाग आणि सैन्याला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बीएसएफनेही या भागात गस्त वाढवली असून सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात आहेत.

या भागात पाकिस्तानने शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा साठवण्यासाठी दोन मोठी गोदामे तयार केली आहेत. तेथे शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याचा साठा करण्यात येत आहे. एक गोदाम जैसलमेरजवळ रहिमियार खान परिसरात तर दुसरे गोदाम पंजाबच्या सीमेजवळील बहावलपूरमध्ये बनवण्यात आले आहे. शस्त्रसाठा जमवण्यासह या भागात पाकिस्तानी सैनिकांची कुमकही वाढवण्यात आली आहे. तसेच रहिमियार खान भागात लष्करासाठी हेलिपॅडही बनवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या या संशयास्पद हालीचालींमुळे हिंदुस्थानी सैन्यही सतर्क झाले असून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास जवान तयार असल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले.