निबीड… घनदाट…पलामू

8

अनंत सोनवणे,[email protected]

झारखंडमधील पलामू अरण्य… अजूनही प्राण्यांसाठी अत्यंत असुरक्षित… प्रचंड मानवी वस्ती, जंगलतोड, चोरटी शिकार हीच याची ओळख…

पूर्वी बिहारमध्ये आणि आता झारखंड राज्यामध्ये छोटा नागपूर नावाचा एक पठारी प्रदेश आहे. त्याच्या जवळून वाहणाऱया कोचल आणि औरंग या नद्यांनी एक सुंदर अरण्य फुलवलंय. या जंगलाचं नाव पलामू. एकेकाळी हे अत्यंत निबीड अरण्य होतं. बिहारच्या चेरो राजाचं हे राखीव शिकारी जंगल होतं. स्वातंत्र्यानंतर बिहारच्या धनदांडग्या जमीनदारांनी स्थानिक आदिवासींना हाताशी धरलं आणि पलामूच्या वनसंपदेची बेसुमार लूट केली. वन्य प्राण्यांची भयंकर कत्तल केली. त्या काळी पलामूत 25 रुपयांना मृत वाघाची विक्री केली जायची. मृत बिबळय़ा आणि लांडगा 5 रुपयांत मिळायचा. अवघं जंगल नामशेष होण्याच्या मार्गावर होतं. सुदैवानं उशिरा का होईना, पण सरकारला जाग आली. 1960 साली पलामू अभयारण्याची स्थापना करण्यात आली आणि 1973 साली व्याघ्र प्रकल्पाची स्थापना झाली.

tiger-23

ब्रिटिश काळात 1932 साली पलामूत प्रथमच व्याघ्रगणना झाली व त्यानंतर कायम होत राहिली. पूर्वी इथं तृणभक्षी प्राण्यांची संख्या भरपूर होती. वाघही मोठय़ा प्रमाणावर होते. मात्र हळूहळू वाघांची संख्या कमी होत गेली. आजही इथं वाघाचं अस्तित्व दर्शविणाऱया पाऊलखुणा दिसतात. मात्र इथल्या डोंगराळ प्रदेशामुळे वाघाचं दर्शन होणं कठीण आहे.
चित्ता हिंदुस्थानातून 1951 साली नामशेष झाला. मात्र तत्पूर्वी पलामूत हिंदुस्थानी चित्त्याचा वावर होता. 1920 साली बिहारच्या राजानं त्याचे 20 पाळीव हत्ती पलामूच्या जंगलात सोडले. त्यानतंर पलामूत हत्ती दिसू लागले. अन्य जंगलांतून हत्ती इथे आले. वाघ आणि हत्तींबरोबर या जंगलात बिबळय़ा, रानगवा, कोल्हा, लांडगा, रानकुत्रे, रानमांजर, सांबर, भेकर, नीलगाय, चितळ, माकड, साळिंदर, ससे, रानडुक्कर, अस्वल इत्यादी वन्य जीव पाहायला मिळतात. या जंगलात पक्ष्यांच्या 140 प्रजाती आढळतात.

tiger-final

पलामूचं जंगल हे देशातलं एक सर्वात जुनं, मात्र सर्वात असुरक्षित जंगल आहे. त्याला चारही बाजूंनी मानवी वस्तीने घेरलेलं आहे. त्यामुळे जंगलतोड, चोरटी शिकार या समस्या कायम आहेत. नव्वदच्या दशकात इथं नक्षलवाद बोकाळला. त्यामुळे वनविभागाच्या कारवाईत अडथळा निर्माण झाला. इतर जंगलांपासून तोडलं गेल्यानं वन्य प्राण्यांची संख्या वाढण्याला मर्यादा आल्या. राजकीय इच्छाशक्तीशिवाय हे जंगल आता वाचवता येणार नाही.

पलामू व्याघ्र प्रकल्प
प्रमुख आकर्षण…वाघ
जिल्हा…लातेहार
राज्य….झारखंड
क्षेत्रफळ…1129.93 चौ. कि.मी.
निर्मिती…1973
जवळचे रेल्वे स्थानक…धनबाद
(245 कि.मी.)
जवळचा विमानतळ…रांची
(140 कि.मी.)
निवास व्यवस्था…वनविभागाचं विश्रामगृह
योग्य हंगाम…नोव्हेंबर ते जून
सुट्टीचा काळ… नाही
साप्ताहिक सुट्टीचा दिवस…नाही