पालघरचा रणसंग्राम : निवडणुकीच्या रिंगणात बविआची उडी; भाजपच्या तंबूत चिंता

44

सामना प्रतिनिधी । वसई

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात आज बहुजन विकास आघाडीने उडी मारली. ही लोकसभा पोटनिवडणूक स्वबळावर लढवू असे सांगतानाच उमेदवाराचे नाव ८ मे रोजी जाहीर करणार असल्याची घोषणा बहुजन विकास आघाडीने आज येथे केली. त्यामुळे बविआचा पाठिंबा गृहित धरून चालणाऱ्या भाजपच्या तंबूत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

खासदार चिंतामण वनगा यांच्या आकस्मिक निधनामुळे पालघर लोकसभा मतदारसंघात येत्या 28 मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे. भाजपच्या गोटात उमेदवारी कुणाला द्यायची यावरून जोर-बैठका सुरू असतानाच आज विरार येथील विवा कॉलेजच्या सभागृहात बहुजन विकास आघाडीची तातडीची बैठक झाली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबन नाईक, माजी महापौर राजीव पाटील, प्रवीण राऊत, आमदार विलास तरे, माजी खासदार बळीराम जाधव, भाऊसाहेब मोहोळ, महापौर रूपेश जाधव, उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स उपस्थित होते.

आमच्या पक्षाचा खासदार हवाच
आमच्या पक्षाचे तीन आमदार आहेत. आता पालघरमधून एक खासदार आमच्या पक्षाचा व्हावा असा निर्धार आम्ही केला आहे असे प्रवीण राऊत यांनी सांगितले. इच्छुक उमेदवारांचे अर्ज ६ मेपर्यंत मागवून ७ मे रोजी मुलाखती होतील आणि उमेदवारांची घोषणा ८ मे रोजी पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत होईल असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेचाही चार दिवसांत निर्णय
ही पोटनिवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्धार शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांच्यासह जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या भावना सांगितल्या. उद्धव ठाकरे यांनी पुढील चार दिवसांत निर्णय घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचीही स्वबळाची तयारी
काँग्रेसनेही ही निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. त्यासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन झाल्या आहेत. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी यासाठी पालघरमध्ये ठिय्या दिला असून काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत, शंकर नम, दामोदर शिंगडा आणि सचिन शिंगडा यांची नावे चर्चेत आहेत.

भाजपचा उमेदवार ठरेना!
निवडणूक तोंडावर येऊन ठेपली तरी भाजपचा उमेदवार अजूनही ठरत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी द्यावी असे एका गटाचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी त्यांचे पुत्र डॉ. हेमंत सवरा यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या