पालघरमध्ये शिवसेनेने विजयाचे खाते उघडले; कैलास म्हात्रे बिनविरोध

सामना प्रतिनिधी । पालघर

24 मार्चला होणाऱ्या पालघर नगर परिषद निवडणुकीआधीच शिवसेनेने आपले विजयाचे खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 6 अ मधून शिवसेनेचे कैलास म्हात्रे बिनविरोध निवडून आले आहेत. या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या एकमेव अपक्ष उमेदवाराने आज अर्ज मागे घेतल्याने म्हात्रे यांची निवड बिनविरोध झाली आहे. दरम्यान, नगराध्यक्षासह नगरसेवकपदासाठी 91 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नगराध्यक्षपदासाठी आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 11 पैकी 8 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे तीन उमेदवार निवडणूक लढवणार असले तरी खरी लढत ही शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये होणार आहे.

संपूर्ण देशात लोकसभा रणधुमाळीला सुरुवात झाली असताना पालघरमध्ये नगर परिषद निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. पालघर नगराध्यक्षपदासाठी 11 तर 28 नगरसेवकपदासाठी 147 अर्ज दाखल होते. त्यापैकी नगराध्यक्षपदासाठी भरलेल्या 11 उमेदवारांपैकी 8 जणांनी माघार घेतली. शिवसेनेच्या श्वेता पाटील, राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे तर अपक्ष अंजली पाटील या तीन उमेदवारांमध्ये नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. मात्र खरी लढत असेल ती शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये. निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाली आहे, तर राष्ट्रवादी, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, जनता दल या पक्षांनी आघाडीची मोट बांधली आहे. मात्र पालघरमध्ये शिवसेनेने केलेल्या विकासकामांमुळे यंदाही मतदारराजा भरघोस मतांनी विजयी करतील, असा विश्वास युतीच्या उमेदवार श्वेता पाटील यांनी व्यक्त केला.

28 जागांसाठी 88 उमेदवार
14 प्रभागांमध्ये 28 नगरसेवकपदासाठी दाखल झालेल्या 147 अर्जांपैकी 59 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता उर्वरित 88 उमेदवारांमध्ये नगरसेवकपदासाठी रस्सीखेच होणार असून निवडणुकीच्या रिंगणात विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 मार्चला स्पष्ट होईल.

पक्षनिहाय उमेदवार
शिवसेना-    19
भाजप-        9
राष्ट्रवादी-    15
काँग्रेस-       7
बविआ-       5
जनता दल-   1