Video-बेकायदेशीर दारू निर्मिती विरोधात पोलिसांची धडक कारवाई, हातभट्या केल्या उध्वस्त

सामना ऑनलाईन । वसई 

पालघर पोलिसांनी बेकायदेशीर दारू निर्मिती विरोधात धडाकेबाज कारवाई सुरु केली आहे. बुधवारी वसईच्या माजली पाडा गावाच्या हद्दीतील खाडीत बेटावर दलदलीमध्ये असलेल्या अवैध गावठी दारू बनवणाऱ्या हातभट्या छापा टाकून उध्वस्त केल्या. यावेळी हातभट्ट्या चालवणारे आरोपी भरत राऊत, मुरलीधर पाटील आणि विशाल पाटील हे पाणी, दलदल व झाडा झुडपांचा फायदा घेऊन परार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून नवसागर मिश्रीत गुळाचा वॉश, गावठी हातभट्टीची दारू व दारू बनवण्यासाठीचे साहित्य असा 4 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.

वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक उमेश पाटील व पोलीस उप निरिक्षक खडतरे यांच्या पथकाने बोटीतून प्रवास करून ही कारवाई केली आहे. पालघर जिल्ह्यात समुद्र किनारी आणि खाडीतील दलदलीत मोठ्या प्रमाणात हातभट्ट्यांच्या माध्यमातून अवैध गावठी दारूची निर्मिती केली जाते. तसेच परराज्यातून देखील मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी, भेसळ केली जाते. पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका लावल्याने अवैध व्यावसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.