पालखी सोहळा पंढरपूरच्या वेशीवर, लाखो नयन सुखावले रिंगण सोहळ्याने


सुनील उंबरे, पंढरपूर

सोमवारी साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्याचे औत्सुक्य अवघ्या महाराष्ट्राला लागलं आहे. सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने देहू-आळंदीसह विविध राज्यांमधून निघालेला पालखी आणि दिंड्यांचा सोहळा पूर्व संध्येला पंढरपूरच्या वेशीवर येऊन ठेपला आहे.

शनिवारी वाखरी येथे माऊलींच्या पालखीचे गोल रिंगण आणि तुकोबांच्या पालखीचे उभे रिंगण पार पडले. पालखी सोहळ्यातील हा शेवटचा रिंगण सोहळा डोळा भरून पाहण्यासाठी वारकऱ्यांनी लाखोंच्या संख्येने गर्दी केली होती. देहू आळंदीहून निघालेल्या सात मानाच्या पालख्या काल १७ दिवसांचा पायी प्रवास करून वाखरी मुक्कामी पोहोचल्या.

महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून निघालेला पालखी सोहळा गेल्या दोन दिवसांपासून पंढरीत विसावला. पंढरपूर शहराच्या चारी दिशांनी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा नामजप करीत दिंड्या दाखल होताना दिसत आहेत. वाखरी येथे विसावलेला मुख्य पालखी सोहळा विधिवत पूजेनंतर सायंकाळी ४ च्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान करेल. वारकरी प्रथेप्रमाणे संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा पंढरपूरमधून वाखरी येथे रविवारी स्वागतासाठी दाखल होईल. संतांच्या भेटीनंतर हा सोहळा हरिनामाचा जयघोष करीत पंढरपूरमध्ये मध्यरात्रीपर्यंत विसावेल.

आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा सोमवारी पहाटे साजरा होत आहे. श्री विठ्ठल रखुमाईंची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. दरम्यान मराठा आणि धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणी वरून महापूजेला विरोध दर्शविल्याने मुख्यमंत्री येणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. आंदोलक महापूजेपासून रोखण्यावर ठाम असले तरी पोलीस प्रशासनाने मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याची जोरदार तयारी केली आहे. वारी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी आंदोलक नेत्यांची धरपकड सुरू केली केली आहे.

पाहा रिंगण सोहळ्याचा व्हिडीओ-