​ही मराठमोळी अभिनेत्री झळकणार हॉलिवूडपटात

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमधील अनेकांचं हॉलिवूडमध्ये काम करण्याचं स्वप्न असतं. अर्थात दीपिका किंवा प्रियांकासारख्या अभिनेत्रींना ही संधीही मिळाली आहे. पण यावेळी हॉलिवूडमधून आलेली चित्रपटाची संधी मिळालीये ती एका मराठी अभिनेत्रीला. ब्रेकअप के बाद या अल्बममधून झळकलेली आणि रुंजी या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पल्लवी पाटील ही ती भाग्यवान अभिनेत्री ठरली आहे.

pallavi-patil

‘स्वोर्ड्स अँड स्केपट्रेस’ नावाच्या या चित्रपटात प्रेक्षकांना पल्लवीचा अभिनय पाहायला मिळणार आहे. ‘स्वोर्ड्स अँड स्केपट्रेस’ हा चित्रपट झाशीच्या राणीच्या आयुष्यावर आधारित असून या चित्रपटात पल्लवी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पल्लवीने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवातही केली आहे. या चित्रपटाचे काही चित्रीकरण हिंदुस्थानी तर काही परदेशात होणार आहे. सध्या राजस्थानमधल्या चित्रीकरणाचं शेड्युल संपल्यानंतर पल्लवी पुढच्या चित्रीकरणासाठी लंडन आणि मोरोक्कोला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वाती भिसे करत असून स्वातीने यापूर्वी ‘द मेन ह्यू न्यू इन्फिनिटी’साठी असोसिएट प्रोड्युसर म्हणून काम केले होते.

१८५७ला लक्ष्मीबाईंनी दिलेल्या लढ्यात त्यांच्यासोबत असणाऱ्या पाच स्त्रियांची कथा प्रेक्षकांना स्वोर्ड्स अँड स्केपट्रेस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पल्लवी या चित्रपटात कुणबिणीची भूमिका साकारणार असून ती या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेत आहे. या भूमिकेसाठी ती घोडेस्वारीसुद्धा शिकली आहे. तिने या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. ऑडिशनमधूनच तिची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. या चित्रपटात पल्लवी एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.