पणजीची पोटनिवडणूक पर्रीकरांसाठी सोपी?

28

सामना ऑनलाईन । पणजी

पणजी आणि वाळपई मतदारसंघाच्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असून २३ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून २८ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा देऊन गोव्याच्या राजकरणात परतलेले मनोहर पर्रीकर पणजी मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार आहेत.

या पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांना मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. यापूर्वी पर्रीकर यांच्या विरोधात काँग्रेसने माजी मंत्री बाबुश मोन्सेरात यांना निवडणूक रिंगणात उतरवलं होतं. मात्र, मोन्सेरात यांनी काँग्रेसमधून भाजप आघाडी सरकारचा महत्वाचा घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसची आता मोठी अडचण झाली आहे.

या पोटनिवडणुकीसाठी ‘आप’ही चाचपणी करत आहे. २०१७च्या निवडणुकीत आम आदमी पक्षातर्फे वाल्मिकी नाईक यांनी भाजपच्या सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, पर्रीकर यांचं वर्चस्व असल्याने आपची डाळ अजिबात शिजू शकली नव्हती. आता पुन्हा एकदा पणजी मतदार संघातून पोटनिवडणूक लढवण्याची चाचपणी आपने सुरू केली आहे.

या पोटनिवडणुकांसंबंधी २९ जुलै रोजी अधिसूचना जाहीर केली जाणार आहे. ५ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार असून ७ ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. ९ ऑगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी मतदान आणि २८ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या