घंटा गाडीच्या ठेक्यावरून दोन नगरसेवक भिडले

10

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

विकासाच्या मुद्यावर आमदार प्रशांत परिचारक यांनी शहरवासियांसमोर मतांची झोळी पसरविल्यानंतर नागरिकांनी परिचारक व मित्र पक्षाच्या नगरसेवकांना भरभरून मते देत नगरपरिषदेची सत्ता पुन्हा निर्विवादपणे ताब्यात दिली. परंतु बहुमताची हवा डोक्यात घुसलेले लोकप्रतिनिधी शहराच्या विकासाकडेच दुर्लक्ष करीत असून केवळ आर्थिक झोळी भरण्यासाठी धडपड करत असल्याचे पहावयास मिळत आहे. घंटा गाडीच्या ठेक्यावरून परिचारक गटाच्या नगरसेवकामध्ये मोठा राडा झाला असून याबाबत शहर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन २०१६ साली राजू उर्फे सुजितकुमार एकनाथ सर्वेगोड हे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. माजी नगरसेवक प्रताप गंगेकर हे दोघे एकमेकांना १५ वर्षापासून ओळखतात. मंगळवारी सायंकाळी ४.४५ च्या दरम्यान आंबेडकर नगर येथील सम्राट चौकात सर्वगोड थांबले असता प्रताप गंगेकर यांनी तू घंटागाडीचे टेंडर का टाकले म्हणून फोनवर विचारणा केली. तेव्हा टेंडर मिळेल त्याला मिळेल परत बघू असे सर्वगोड म्हणाले. त्यानंतर गंगेकर यांनी तू आम्हाला ओळखले नाही असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करून जीवंत मारण्याची धमकी दिली. त्यावेळी सर्वगोड हे घाबरून तेथून पळाले.

गंगेकर व सागर लऊळकर यांनी शिवाजी चौक येथे पाठीमागून येऊन राजेंद्र सर्वगोड यांच्या अंगावर मोटार सायकल घालून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. मारहाणीमध्ये सर्वगोड याच्या पायाला लागले. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकामध्ये प्रताप गंगेकर व सागर लऊळकर यांच्याविरोधात फोन वरून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याबाबत सर्वगोड यांनी तक्रार दाखल केली आहे.