पंढरपुरातील मारहाण शॉर्टकट दर्शनाच्या वादातून?

1

सामना ऑनलाईन, पंढरपूर

श्री विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापक विलास महाजन यांना बेदम मारहाण करण्यात आली. दत्ता संगीतराव नावाच्या तरूणाने ही मारहाण केली आहे. भाविकांकडून पैसे घेऊन शॉर्टकट मार्गाने दर्शन देण्याच्या कारणावरून हा प्रकार घडला असावा अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. मात्र पोलिसांकडून अधिकृतरित्या मारहाणीचं नेमकं कारण सांगण्यात आलेलं नाही.

दत्ता संगीतराव हा पंढरपुरात गाईडचं काम करतो. रविवारी मध्यरात्री महाजन मंदिरामधून घराकडे निघाले होते. वाटेमध्ये दत्ता संगीतराव याने स्टेशन रोडवरील गाडगे महाराज धर्मशाळेजवळ महाजन यांच्या मोटर सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे महाजन गाडीवरून खाली पडले. महाजन गाडीवरून खाली पडल्यानंतर संगीतराव याने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. महाजन यांनी कशीबशी सुटका करून घेत पोलीस ठाणे गाठले आणि संगीतराव विरूद्ध तक्रार नोंदविली. महाजन यांच्यावर पंढरपुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मारहाणीनंतर मंदिर समितीचे कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.