टप्पा येथील बंधूभेटीने वारकरी भारावले, आज पालख्या वाखरी मुक्कामी

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

आवडीने भावे हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।।
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा । पती लक्ष्मीचा जाणतसे ।।

श्री पांडुरंगावर अतूट श्रद्धा व संतांच्या पायी विश्वास ठेवून विठ्ठलनामाचा अखंड गजर करीत पंढरीस निघालेला वैष्णवांचा मेळा पंढरपूरजवळ टप्पा येथे पोहोचला. येथे संत ज्ञानदेव व सोपानदेव यांच्या बंधूभेटीच्या सोहळ्यानंतर पंढरपूर तालुक्यात संतांच्या पालखी सोहळ्याचे मोठ्य़ा उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत झाले. त्यानंतर संत ज्ञानदेवांचा पालखी सोहळा भंडीशेगाव मुक्कामी, तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिराची कुरोली मुक्कामी पोहोचला. आज संतांचा पालखी सोहळा शेवटच्या वाखरी मुक्कामासाठी मार्गस्थ होईल.