पंढरपुरातील तरुणाचा मेलबर्नमध्ये संशयास्पद मृत्यू

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेत असलेल्या पंढरपुरातील ओमप्रकाश ठाकरे या विद्यार्थ्याचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला. ओमप्रकाशचे वडील महादेव ठाकरे हे पंढरपूर एलआयसीमध्ये विकास अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

ओमप्रकाश याचा मृत्यू झाल्याची बातमी आज पहाटे ठाकरे कुटुंबाला समजली. ओमप्रकाश हा अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया येथील स्विनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी हॉवथर्न येथे शिक्षण घेत होता. तो मेलबर्न येथे वास्तव्याला होता. फेब्रुवारी महिन्यात बहिणीचे लग्न असल्याने तो पंढरपूरला आला होता. लग्न सोहळ्यानंतर महिन्याभरापूर्वी पुन्हा तो शिक्षणासाठी मेलबर्नला गेला होता.

ओमप्रकाशच्या निधनाची बातमी समजण्यापूर्वी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्याचे आई-वडिलांशी बोलणे झाले होते. बोलणे झाल्यानंतर दोन तासांनी त्याचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी ठाकरे कुटुंबीयांना समजली. या अनपेक्षित बातमीने ठाकरे कुटुंब हादरून गेले आहे. ओमप्रकाशने पुण्यामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते.