” पालखी सोहळा”

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, वारकरी, लोककला अभ्यासक

।।पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणिक न करी तीर्थव्रत।।

ज्ञानेश्वर माऊली… ज्ञानराज माऊली तुकाराम… मुक्ताई, तुकोबा, ज्ञानोबा, सोपानकाका, निवृत्तीनाथ… साऱयांच्या पालख्या ठिकठिकाणाहून एकाच दिशेने निघाल्या आहेत… आसावल्या आहेत… पंढरपूरला पोहोचेपर्यंत या प्रत्येक पालखीचा सोहळा साजरा होत असतो… ज्ञानाचा अश्व रिंगण धरतो… वारकरी हमामा घालतो… काय आणि किती वर्णावे… हे पंढरीचे सुख…

ज्येष्ठात आकाशातील घननीळ बरसू लागतो. जणू माऊलीच्या दुधासारखा. पेरणीचा आनंद पेऱया पेऱयाने वाढत जातो आणि महाराष्ट्रातील शेतकऱयांनाच नव्हे तर सर्व विठ्ठल भक्तांना वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. ‘पंढरीचा वारकरी। वारी चुको न दे हरी’ अशी उन्मनी अवस्था निर्माण होते. ‘माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी।। पांडुरंगी मन रंगले। गोविंदाचे गुणी वेधीले’ ही संत तुकारायाचीही होती. ‘संपत्ती सोहळा नावडे मनाला। लागला टकळा पंढरीचा।। जावे पंढरीशी आवडी मानशी। कै एकादशी आषाढी ये।।’ विठुरायाच्या दर्शनासाठी दिंडय़ा-पालख्यांच्या रुपाने संतांची मांदियाळी महाराष्ट्रातून निघते. नाशिक, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ, पैठणहून एकनाथ महाराज, मेहूणहून मुक्ताई, मंगळवेढय़ाहून दामाजीपंत, सासवडहून सोपानकाका, शेगावहून गजानन महाराज अशा विविध संतांच्या दिंडय़ा पालख्यांनी पायवाट अबीर गुलालाची होते.

lead-2

ज्येष्ठ वद्य सप्तमीला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान श्रीक्षेत्र देहू गावाहून होते तर ज्येष्ठ वद्य अष्टमीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान श्रीक्षेत्र आळंदीहून होते. संत तुकाराम महाराजांच्या पालखीला सोहळय़ाचे स्वरूप दिले ते त्यांचे सुपूत्र नारायण महाराज यांनी. नारायण महाराज तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका एकाच पालखीत नेऊन ती पालखी समारंभपूर्वक पंढरीला घेऊन जायचे. सुमारे तीनशे वर्षांची परंपरा या पालखी सोहळय़ाला आहे. या पालखीचं प्रस्थान होतं. प्रस्थान म्हणजे निघणे अर्थात पर स्थानी निघणे. दिंडय़ा, पताका, गरूडटक्के, टाळ-मृदंगाच्या गजरात पालखीचं प्रस्थान होतं. तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या घरात पिढय़ानपिढय़ा पंढरीची वारी होती. ‘पंढरीची वारी आहे माझ्या घरी। आणिक न करी तीर्थव्रत।।’ असे मोठय़ा अभिमानाने तुकाराम महाराज सांगतात.

तुकोबांच्या घराण्याचे मूळ पुरूष विश्वंभरबाबा. तुकोबा हे विश्वंभरबाबांच्या घरातील आठव्या पिढीचे वशंज. विश्वंभरबाबांपासून पंढरीची वारी सुरू झाली. तुकाराम महाराज १४०० टाळकऱयांसह देहूहून पंढरपुरला वारीसाठी निघत. संत तुकारामांनी आळंदीला ज्ञानेश्वर महाराज मंदिर बांधणीच्या कामात पुढाकार घेतल्याचा उल्लेख बॉम्बे प्रेसिडन्सी व्हॉल्यूम पार्ट ३, पुणे गॅझेट १८८५, पान १०२-१०३  मध्ये केला गेला आहे अशी माहिती संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी दिली.

तुकोबारायांची पालखी

संत तुकारामांनी पंढरीच्या वारीचा नेम चुकविला नाही. एकदा आजारी असताना त्यांनी तो चुकविला. तेव्हा त्यांनी २४ अभंगांची रचना केली व पांडुरंगाला आर्त हाक दिली.

‘का माझे पंढरी न देखती डोळे।

काय हे न कळे पाप त्यांचे।।

पाय पंथ का हे न चळती वाट।

कोण हे अदृष्ट कर्म बळी।।

lead-1

पालखीत प्रस्थानाच्या वेळी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पादुका ठेवण्याची परंपरा अन्य संत आणि वारकऱयांना सुचली ती बंधु वियोगाच्या रामायणातील कथेमुळे. प्रभु रामाचा वियोग भरताला सहन झाला नाही त्याने रामाच्या पादुका राज सिंहासनावर ठेवून राज्य केले. या पादुकाचा महिमा असाच वारकरी संप्रदायाने स्वीकारला. पालखी सोहळय़ाचा कागदोपत्री उल्लेख राजाराम महाराजांनी नारायण महाराजांना इ.स. १६९४ च्या येलवाडी गावच्या सनदेत प्राप्त झाला आहे. पालखीसंबंधी तुकोबांच्या वंशात तंटा सुरू झाला त्यानंतर हैबतबाबा आरफळकर यांनी इ.स.१८३२ च्या पुढे श्रीक्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा स्वतंत्र सोहळा सुरू केला. वारकऱयांच्या फडांची परंपरा १३ व्या शतकापूर्वीची आहे.

माऊली निघाली

श्रीक्षेत्र आळंदी येथून ज्येष्ठ वद्य अष्टमीला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होते. या सोहळय़ात नोंदणीकृत २५० दिंडय़ासह एकूण ४५० दिंडय़ा सहभागी होतात. आळंदीहून ज्येष्ठ वद्य अष्टमीला पालखीचे प्रस्थान होताना प्रथम संत ज्ञानेश्वरांच्या पादुका पालखी सोहळय़ाचे प्रमुख शितोळे सरकार याच्या वंशजांच्या हाती सोपविल्या जातात. हैबतबाबा आरफळकर यांनी शितोळे सरकारांकरवी संत ज्ञानेश्वरांच्या पालखीला वैभव पात्र करून दिले ते घोडा, पताका, गरूडटक्के आदी रूपाने! दुपारी चार वाजता आळंदीचे ज्ञानेश्वर मंदिर ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल । श्री ज्ञानदेव तुकाराम’ या नामघोषाने दुमदुमून जाते. आधी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची पुजा होते. मानकऱयांना नारळ प्रसाद देण्यात येतो. मंदिरात प्रदक्षिणा करून भजनाच्या घोषात पालखी महाद्वाराबाहेर येते. वळून पूर्वेकडे जवळच्या गांधी वाडय़ात जाते. या घरास माऊलीचे ‘आजोळ घर’ म्हणतात. ज्येष्ठ वद्य नवमीस पहाटे पूजा, आरती होऊन पालखी पुण्याकडे निघते. पालखीत हैबतबाबांच्या भजनी मालिकेतील अभंग म्हणण्याची परंपरा आहे. पालखीत सर्वात पुढे दोन घोडे, चोखामेळा दिंडी, चौघडा मागच्या पुढच्या दिंडय़ांच्या मध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांचा रथ असे स्वरूप असते.

lead-last

थोरल्या पादुकांचे ठिकाण आळंदी-पुणे रस्त्यावर तेथे आरती होते. शिंदे छत्री-हडपसर, बोरावके मळा, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडी शेगाव, वारवरी आणि पंढरपूर अशी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची ठिकाणे-लोणंद येथील चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होते. सदाशिवनगर येथे पहिले गोल रिंगण होते. खुडुसफाटा येथे दुसरे गोल रिंगण होते. वेळापूरच्या ठाकूरबुवांच्या समाधीजवळ तिसरे गोल रिंगण होते. भंडी शेगावला उभे रिंगण, चौथे गोल रिंगण होते. एकादशीच्या दिवशी पालखी नगर प्रदक्षिणेला जाते आणि पौर्णिमेच्या दिवशी काल्या आणि गोपाळपुराला जाते. पौर्णिमेला दुपारी पालखी चार वाजता पंढरपुराहून आळंदीला परतीच्या प्रवासाला निघते. पालखी सोहळय़ाच्या खर्चासाठीशिवाजी महाराजांनी आळंदी गावाला चौथाई वसूल दिला. २५ बिघे जमिनीचे उत्पन्न मिळू लागले. पुढे श्री राजाराम महाराजांनी आळंदी गावच दान दिले. पुढे पेशवे सरकारांनी पूजा, नैवेद्य, पालखी खर्चासाठी कारभारी नेमून व्यवस्था केली. इंग्रजांचे राज्य आल्यावर त्यांनी शिंदे सरकारशी तह केला आणि आळंदी गावचे उत्पन्न श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या खर्चासाठी दिले.

शिस्त महत्त्वाची

पालखी सोहळा हा शिस्तीसाठी प्रसिद्ध आहे. पालखी सोहळय़ावर पूर्ण नियंत्रण ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे असते. चोपदार अतिशय महत्त्वाची भूमिका पालखी सोहळय़ात बजावतो. त्याच्याच इशाऱयाने पालखी सुरू होते, विसावते. पालखी सोहळय़ात कुणाची मौल्यवान वस्तू हरवली तर ती चोपदाराकरवी परत मिळते. पहाटे ४ ते ४.३० च्या सुमारास दिंडय़ामधील वारकरी प्रातःकालीन स्नानादि विधी उरकतात. सकाळी ६.६.३० ला पालखी निघते. ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा गजर पालखी उचलताना होतो. मग ‘जय जय रामकृष्ण हरि’ सुरू होते. ‘रूप पाहता लोचनी। सुख झाले हो साजणी’ हा रूपाचा अभंग होतो नंतर मंगलचरणाचे अभंग होतात त्यानंतर भूपाळय़ा, वासुदेव, आंधळे, पांगळे, संकीर्ण अभंग, विशिष्ट वारांचे अभंग, हरिपाठाचे अभंग होतात. हरिपाठ संपतो त्यावेळी मुक्कामाचे ठिकाण येते. मग विसावा पुन्हा रात्री कीर्तन, हरिजागर!

सदा नाम घोष। करू हरि कथा हे वारीचे सूत्र असते. त्यात कीर्तन भजनांसोबत भारूडे ही रंगतात. ‘दिन रजनी हाचि धंदा। गोंविदाचे पवाडे’ या अंतरिक उर्मीने वारीतले वारकरी पुंडलिक वरदेचा गजर करीत असतात. वारी हा आता केवळ वैष्णवांचा सोहळा राहिला नाही तर विश्वव्यापी सोहळा झाला आहे. आजच्याच भाषेत बोलायचे तर वारी हा महा इवेन्ट झाला आहे. वारीमध्ये समकालीन प्रश्नांवर देखील जनजागरण घडविले जाते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व शासनाच्या पर्यावरण विभागसह महाराष्ट्र कला संस्कृती मंच ही संस्था पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबविते. ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या ८६ नंबरच्या दिंडीत वाबळे महाराजांसह भारूडकार चंदाबाई तिवाडी, शाहीर देवानंद माळी पर्यावरण जागृतीचा संदेश आळंदी ते पंढरपूर वारीत देतात. शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फेदेखील ग्रामस्वच्छतेचे अभियान राबविले जाते. स्त्रr-भ्रूण हत्या, प्लॅस्टिक बंदी, स्वच्छ भारत मोहीम, सेंद्रिय खतांची जागृती, जातीयता निर्मूलन अशा विविध विषयांवर जनजागरण वारीत घडविले जाते. वारी म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग!