भाई पंजाबराव चव्हाण

2

गजानन चेणगे

आपल्या मातीची ओढ अखेरच्या श्वासापर्यंत कायम ठेवणारे, स्वातंत्र्यासाठी लढा देणारे, पुरोगामी विचारांची ध्वजा खांद्यावर घेणारे भाई पंजाबराव चव्हाण यांनी गेल्या महिन्यात वयाच्या 91व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या वयातही ते तरुणांना मार्गदर्शक ठरेल असे काम करीत होते. भरकटलेल्या समाजाला चांगल्या विचारांची दिशा मिळाली की, समाज चांगला बनत जातो. हे चांगले विचार देणाऱया काही तत्त्वनिष्ठ व्यक्ती समाजात असल्यामुळेच समाज प्रगतीपथावर जातो. अशी समाजाला दिशा देणारी, समाजातील तरुणांना मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रात जी काही मोजकी माणसे आहेत त्यामध्ये कराडच्या भाई पंजाबराव चव्हाण यांचा उल्लेख करावा लागतो.

भाई पंजाबराव नाईकजी चव्हाण यांचा जन्म सातारा जिह्यातील पाटण तालुक्यातील कुंभारगाव या छोटय़ाशा गावी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंभारगाव येथे झाले. पुढील माध्यमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते इंदूरला गेले. माजी केंद्रीय मंत्री आनंदराव चव्हाण यांचे ते पुतणे होत. आनंदराव चव्हाण हे त्यावेळी यशवंतराव होळकर यांचे ते सेक्रेटरी होते. ते इंदूरला असल्यामुळे भाईंचे शिक्षण इंदूरला झाले. ते कट्टर देशप्रेमी असल्यामुळे १९४९ मध्ये नौदलामध्ये दाखल झाले. नौदलात असताना ते अंदमान निकोबार, पोर्ट ब्लेअर येथे होते. १९४९ ते १९५५ पर्यंत त्यांनी नौदलात नोकरी केली.

त्यानंतर भाईंचे मन शेती व राजकारणात रमले. पहिल्यापासून त्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये काम केले. त्यांच्यावर डाव्या विचारांचा पगडा होता. त्यांनी गोवा मुक्ती संग्रामामध्ये भाग घेतला. एस. एम. जोशी, कॉम्रेड श्रीपाद अमृतराव डांगे यांच्याबरोबर काम केले. भाई या नावाने महाराष्ट्रात ज्या काही चार-पाच जणांना ओळखले जाते त्यामध्ये पंजाबराव चव्हाण यांचा समावेश आहे. भाईंनी जीवनात कधीही तत्त्वाशी तडजोड केली नाही. त्यांच्या विचारांमध्ये सर्वसामान्यांच्या बद्दल वाटणारा जिव्हाळा प्रकर्षाने जाणवतो.

त्यांना राजकारणात अनेक संधी आल्या, पण त्यांनी त्या कधीही स्वीकारल्या नाहीत. त्यांचे चुलत बंधू पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरही ते कधीही मंत्रालयात कोणत्याही कामासाठी गेले नाहीत किंवा कधीही ते सक्रिय राजकारणात उतरले नाहीत. राजकारणात नीतिमत्ता जपणारे ते तत्त्वनिष्ठ नेते होते असे म्हटले तर वावगे ठरू नये. सडेतोड व स्पष्ट बोलणारे व त्याप्रमाणे वागणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

भाईंचा शेतीचा व्यासंग खूप मोठा होता. वयाच्या एक्क्याणवव्या वर्षीही ते शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत असत. रेशीम शेतीचा अभिनव प्रयोग करून त्यांनी पारंपरिक ऊस शेती पेक्षा जास्त उत्पन्न रेशीम शेतीत मिळते हे त्यांनी सिद्ध करून दाखविले. त्यांनी पोल्ट्री व्यवसायातही नवीन प्रयोग केले असून त्याद्वारे चांगल्या उत्पन्नाचे मार्ग चोखाळले असून तरुणांनीसुध्दा या व्यवसायाकडे वळावे व कष्टाची तयारी ठेवून शेती व शेतीपूरक व्यवसाय करावा असा संदेश त्यांनी दिला. मालखेड येथील शेतात त्यांनी केलेला हळदीचा प्रयोगही पाहण्यासारखा आहे. निव्वळ ऊस शेतीच्या मागे लागण्यापेक्षा हळदीचे विक्रमी उत्पन्न घेऊन त्यातच ऊस लागण करून दीड वर्षात दोन पिके घेण्याचे कौशल्य त्यांनी दाखविले. त्यांची ही प्रयोगशीलता आजच्या पिढीला निश्चितच अनुकरणीय आहे.

आज ग्लोबल वार्ंमगचा प्रश्न सर्वत्र भेडसावत असताना त्यांनी कराड तालुक्यातील मालखेड या गावी स्वतःच्या शेतात व शेताच्या बांधावर २५०० विविध जातींची झाले लावली आहेत. ती सर्व झाडे आज चांगल्या पध्दतीने बहरली आहेत. वृक्षलागवड व वृक्ष संवर्धनाच्या क्षेत्रातील त्यांचे हे योगदानही मोलाचे आहे.

सध्याच्या राजकारणाबद्दल ते सडेतोडपणे बोलत. लोकांना लोकशाही खऱया अर्थाने समजलीच नाही असे त्यांचे मत होते. लोकच भ्रष्टाचाराला खतपाणी घालतात. त्यातूनच सध्याची अधोगती होत आहे. ही खरी प्रगती नाही. शेतकरी हा देशाच्या आर्थिक विकासाचा कणा असला तरी तो जे काही पिकवितो त्याची किंमत तो ठरवू शकत नाही अशी शोकांतिकाही ते व्यक्त करत.

आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत भाईंनी माणुसकी जपत, भ्रष्टाचारापासून दूर रहात देशसेवेचाच विचार केला. उत्तम शेती करणे, त्यातून उत्तम पध्दतीने पीक घेणे ही सुध्दा एक प्रकारची देशसेवाच आहे असे ते नेहमी म्हणायचे. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उत्तम शेती करावी असा संदेश ते नेहमी द्यायचे.

त्यांचे जीवनचरित्र रेखाटणारे एक पुस्तक लिहायचे काम आम्ही नुकतेच सुरू केले होते. ते काम आज अर्धवट राहील्याची खंत मनामध्ये राहील. त्यांच्या कामाचा, विचारांचा वारसा पुढे चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.