एकेकाळी पत्र्याच्या घरात राहायचा कालीन भैय्या, आता विकत घेतला अलिशान फ्लॅट

लहानपणी त्रिपाठी यांनी गावातील काही नाटकांमध्ये मुलीची भुमिका साकारली आणि ग्रामस्थांनी त्यांची प्रशंसा केली.

सामना ऑनलाईन । मुंबई

मिर्झापूर या वेबसिरीजमुळे तसेच स्त्री, गँग्स ऑफ वस्सेयपूर, नील बट्टे सन्नाटा अशा चित्रपटांमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता पंकज त्रिपाठीने नुकतेच मुंबईत स्वत:चे घर घेतले आहे. मालाड मड आयलंडजवळ त्याने घर घेतले असून नुकताच त्याने बायको मृदुलासोबत घर प्रवेश केला.

एका मुलाखतीत त्यांनी नवीन घराबद्दल सांगताना पंकज यांनी पाटणातील त्यांच्या पत्र्याच्या घराच्याही आठवणी सांगितल्या. ‘मी नवीन घरात प्रवेश केला आहे मात्र आजही मी पाटणातील माझं घर विसरू शकलेलो नाही. त्यावेळी मी पत्र्याच्या घरात राहायचो. एकदा तुफानी पावसात माझ्या घराचा पत्रा उडून गेला होता. त्यावेळी मी आकाशाकडे पाहात बसलो होतो. आम्ही जेव्हा नवीन घरात प्रवेश केला तेव्हा माझी बायको खूप भावनिक झाली होती. गेल्या वर्षी पर्यंत मी मला जी भूमिका मिळेल ती करायची पण आता मी माझ्या मर्जीने भूमिका निवडू शकतो’, असे पंकज यांनी या मुलाखतीत सांगितले.