कधीही संघर्ष न करणाऱ्या काँग्रेसवाल्यांची संघर्ष यात्रा – पंकजा मुंडे

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

कधीही संघर्ष न करणारे काँग्रेसवाले सध्या संघर्ष यात्रा काढत असून ज्यांनी जनतेच्या पैशांवर फक्त डल्ला मारण्याचे काम केले ते राष्ट्रवादीवाले हल्लाबोल यात्रा काढत आहेत. दोन्ही पक्षांच्या आंदोलनाला माणसे कमी अन् व्यासपीठावर मात्र गर्दी जास्त असल्याची टीका राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली.

तालुक्यातील चिचोंडी येथे मुंडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड होते तर या वेळी व्यासपीठावर खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डीले, मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, सुभाष पाटील, अक्षय कर्डीले, संदीप कर्डीले, जि.प. सदस्या संध्या आठरे, सुनील परदेशी तसेच पंकजा यांचे पती अमित पालवे हे उपस्थित होते. या सभेत वंजारी समाज आरक्षणाच्या विषयावर मुंडे काही तरी भाष्य करतील अशी अपेक्षा होती मात्र त्यांनी या विषयावर बोलणे टाळले.

या वेळी बोलताना मुंडे म्हणाल्या कि, संघर्ष या शब्दाशी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. सत्तर वर्ष देशावर राज्य करून त्यांनी देशाला पिछाडीवर नेण्याचे काम केले तर राष्ट्रवादी वाल्यानी राज्यात १४ वर्ष राज्य करून जनतेला वनवास भोगायला लावला. जनता त्यांच्या कारभाराला कंटाळली असून त्यांच्या मागे जनमत नसल्याचे सांगली, जळगाव महापालिकेत दिसून आले आहे. अनेक वर्ष सत्ता भोगून त्यांनी कोणताही विकास केला नाही मात्र आमच्या शासनाला अजून पाच वर्ष पूर्ण व्हायची असताना ते आमच्या कामाचा हिशोब मागत आहे. २०१५ साली नगर जिल्ह्यात ९९५ टँकर होते मात्र जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामा मुळे हि संख्या आता हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच राहिली आहे. नगर जिल्ह्यात ७७५ कोट रुपये खर्चून २१४ रस्ते बनवण्यात येणार असून संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री सडक योजनेतून तीस हजार कि.मी. चे रस्ते बनवण्यात येणार आहेत.

माझ्यावर अनेक आरोप करण्याचे काम दोन्ही काँग्रेसवाले सध्या करत आहे मात्र या आरोपांना घाबरून घरी बसणारी मी नाही. माझा बाल सुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही. संघर्ष काय असतो व कसा करावा लागतो याचे बाळकडू आपल्याला स्व. मुंडे यांनी दिले आहेत. कोणाच्याही आरोपाने मला काही फरक पडत नाही. बीड जिल्हा जसा भाजपचा बालेकिल्ला आहे तसा नगर जिल्हा आपण शतप्रतिशत भाजपचा करणार असून या जिल्ह्यात निवडणूक काळात सुदर्शन चक्र ऐनवेळेस फिरून बऱ्याच राजकीय उलथापालथ होतात हे आपल्याला माहित आहे मात्र विधानपरिषद निवडणुकीत मी सुद्धा असेच सुदर्शन चक्र फिरवून घड्याळवाल्यांचा उमेदवारच गायब केला होता, हे सर्वानी लक्षात घ्यावे. युती शासनाच्या कामकाजावर सर्वसामान्य जनता खूश असून दोन्ही काँग्रेसवाल्यानी मात्र जनाधार गमावला असल्याचे शेवटी मुंडे म्हणाल्या. प्रास्ताविक एकनाथ आटकर, सूत्र संचालन उद्धव काळापहाड तर आभार वैभव खलाटे यांनी मानले.