पानसरे हत्याप्रकरण आरोपींची माहिती देणाऱ्याला १० लाखांचे इनाम

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी पोलिसांना पाहिजे असलेले संशयित आरोपी सनातनचे साधक विनय बाबुराव पवार (रा. उंब्रज, ता. कराड, जि. सातारा) आणि सारंग दिलीप आकोळकर (रा. चिंतामणी अपार्टमेंट, पुणे) यांची माहिती देणाऱयास गृह विभागाकडून 10 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. दाभोळकर आणि पानसरे हत्याप्रकरणात विनय पवार आणि सारंग आकोळकर या दोघांवर गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी सनातन संस्थेच्या आश्रमात छापे टाकूनही ते दोघे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणी विनय पवार आणि सारंग आकोळकर यांची माहिती देणाऱयास सीबीआयने यापूर्वीच पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.