पंतप्रधान व छोटूलाल


मोदी हे आभाराचे भाषण हसतमुखाने करीत असताना बाराबंकी येथील बडागावात राहणार्‍या छोटूलाल या मुलाला आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही बँकेने पैसे दिले नाहीत. छोटूलाल हा जिवंतपणीच मेला व चारशेच्या वर लोक प्रत्यक्ष बँकांच्या रांगेत मरण पावले. त्यामुळे पंतप्रधानांनी ज्या नवीन घोषणांचा पाऊस पाडला तो अशा छोटूलालसाठी उपयोगाचा नाही. पंतप्रधान मोदी यांच्यावर आमचा लोभ आहे व राहणारच, पण देशातील आर्थिक अराजक मानवी संहारास आमंत्रण देणार असेल तर देश वाचविण्यासाठी सत्य सांगणे हा अपराध नसून राष्ट्रभक्तीच आहे असे आम्ही मानतो.

पंतप्रधान व छोटूलाल

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येस पंतप्रधान मोदी यांनी भाषण केले आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी केलेले कोणतेही भाषण हे देशवासीयांना उद्देशून केलेले आहे, असे मानण्याची प्रथा आहे. मोदी यांच्या भाषणाबाबतही तसेच म्हणावे लागेल. मोदी हे भाषणात घोषणा करतात की धमक्या देतात अशी चिंता सगळ्यांना लागून राहिली होती. पण डोक्याला ताप नको व नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येस काही अशुभ कानी पडू नये म्हणून लोकांनी आपापल्यापरीने नवीन वर्ष आगमनाचा आनंद काटकसरीने साजरा केला. अर्थात मोदी यांच्या भाषणात तसे भीतीचे व चिंतेचे काहीच नव्हते. मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांचा भार हलका केला. वृत्तवाहिन्यांवरून एकप्रकारे अर्थसंकल्पातील घोषणांचा पाऊस मोदी यांनी आधीच पाडल्याने जेटली यांचे काम सोपे करून टाकले आहे. आता फेब्रुवारी महिन्यात सादर होणार्‍या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री नवे काय करणार हा प्रश्‍नच आहे. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून पंतप्रधानांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला चूड लावली असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. या निर्णयामुळे सामान्य जनतेचे, मोलमजुरी करून जगणार्‍यांचे कंबरडे मोडले. आज पन्नास दिवसांनंतरही परिस्थिती सुधारलेली नाही. लोकांच्या यातनांवर मोदी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला फुंकर घालतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी फार गांभीर्याने भाषण केल्याचे दिसले नाही. जे रांगेत मेले व जे आजही तडफडत आहेत त्यांचे आभार मानून मोदी यांनी नव्या घोषणांची छत्री हलवली आहे. मोदी हे आभाराचे भाषण हसतमुखाने करीत असताना देशाच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या बातम्या कोणत्याही संवेदनशील माणसाचे

मन विचलित करणार्‍या

आहेत. बाराबंकी येथील बडागावात राहणार्‍या छोटूलाल या मुलाला आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही बँकेने पैसे दिले नाहीत. त्यामुळे घरातील गहू विकून आईवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ या मुलावर आली. छोटूलालचे बँकेत थोडेफार पैसे होते. आईच्या उपचारासाठी पैसे मिळावेत म्हणून तो दोन दिवस बँकेच्या रांगेत उभा राहिला. उपचारांसाठी सोडाच, पण अंत्यसंस्कारासाठीही बँकेतून दोनेक हजार रुपये मिळू शकले नाहीत. असे लाखो छोटूलाल आज सरकारला शाप देत आहेत. त्यांच्यावर आभार प्रदर्शनाची शब्दसुमने उधळून काय होणार? छोटूलाल हा जिवंतपणीच मेला व चारशेच्या वर लोक प्रत्यक्ष बँकांच्या रांगेत मरण पावले. त्यामुळे पंतप्रधानांनी ज्या नवीन घोषणांचा पाऊस पाडला तो अशा छोटूलालसाठी उपयोगाचा नाही. पंतप्रधानांनी ज्या घोषणांची आतषबाजी केली त्यापैकी अनेक घोषणा जुन्याच आहेत व ‘यूपीए’ सरकारच्या काळापासून चालू आहेत. उदाहरणार्थ गर्भवती महिलांना सहा हजारांचे अर्थसहाय्य देण्याची योजना पंतप्रधानांनी जाहीर केली. ही योजना जुनीच आहे. २०१० मध्ये ‘इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना’ या नावाने ही योजना राबवली होती. २०१३ मध्ये ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याखाली वळवून सुरूच राहिली. त्यामुळे आताच्या घोषणेत नवीन काय? ढोकळा जुनाच आहे, तो नव्याने गरम करून वाढलाय किंवा ढोकळा जुनाच, पण चटणी नवीन किंवा शिल्लक कांदाभजी नव्याने तळून ‘गरम’ म्हणून विकणे अशातला हा प्रकार आहे. मात्र असे शिळे, तळकट, तुपकट खाणे हे आरोग्यास शेवटी हानीकारकच ठरते. अ‍ॅसिडीटी, घसा खवखवणे, अपचन, हृदयाच्या रक्तवाहिन्यांत दोष व शेवटी झटक्याने मृत्यू संभवतो. हे असे झटके सध्या रोज पडत आहेत व माणसे मरणाच्या दारात ढकलली जात आहेत. शेतकर्‍यांसाठी पंतप्रधानांनी ज्या घोषणा केल्या त्याबाबतही संभ्रमच आहे. आधीच रिझर्व्ह बँकेने जुन्या रद्द झालेल्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातल्याने

जिल्हा सहकारी बँका

आणि पतसंस्थांची अवस्था बिकट केली आहे. त्यात ज्या रद्द झालेल्या नोटा या बँकांमध्ये जमा झाल्या आहेत त्यादेखील जमा करून घ्यायला रिझर्व्ह बँक तयार नाही. त्याचा आर्थिक तोटा या बँकांनाच सहन करावा लागत आहे. त्यात आता जे काही कृषी कर्जाचे व्याज केंद्र सरकार भरणार असे पंतप्रधानांनी सांगितले आहे तो भार या बँकांना कसा पेलवणार हा प्रश्‍नच आहे. दुसरीकडे २०१५च्या खरीप हंगामाचे अनुदान अद्याप केंद्र सरकारकडून जिल्हा बँकांना मिळालेले नाही. त्यात आता यंदाच्या रब्बीसाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज माफ करण्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. म्हणजे जिल्हा बँकांना केंद्राचे आधीचेच येणे बाकी असताना हा नवीन बोजा सहन करावा लागणार आहे. तो पेलण्याची जिल्हा सहकारी बँकांची कुवत आज तरी नाही. त्यामुळे या बँकांची आर्थिक स्थिती अधिकच नाजूक होईल आणि त्याचा अंतिम फटका सामान्य शेतकर्‍यालाच बसू शकेल. मात्र याचा विचार झालेला दिसत नाही. मुळात लोकांना मोदी यांच्याकडून वेगळ्याच अपेक्षा होत्या. ‘नोटाबंदी’मुळे मेटाकुटीस आलेल्या जनतेला दिलासा कधी मिळेल याचे ठाम उत्तर पंतप्रधानांनी दिले नाही. कारण त्यांच्याकडे बहुधा उत्तरच नसावे. दुसरे असे की, नोटाबंदीनंतर किती काळा पैसा वसूल झाला याचा आकडाही पंतप्रधानांकडे नाही. मग लोकांचे इतके निर्घृण हाल का केले ते सांगावे व नव्या वर्षात तुम्हाला सामान्य जनतेचे आणखी किती बळी हवेत ते जाहीर करावे. पंतप्रधान मोदी यांच्यावर आमचा लोभ आहे व राहणारच, पण देशातील आर्थिक अराजक मानवी संहारास आमंत्रण देणार असेल तर देश वाचविण्यासाठी सत्य सांगणे हा अपराध नसून राष्ट्रभक्तीच आहे असे आम्ही मानतो. छोटूलाल व त्याची माता मरत असेल तर मरू दे. माय मरो पण नोटाबंदी राहो असेच हे धोरण आहे. छोटूलालच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.