पांझरा, जामखेली, मालनगाव धरणे तुडुंब

2

सामना प्रतिनिधी । साक्री

पश्चिम पट्ट्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील पांझरा, जामखेली आणि मालनगाव हे तिन्ही धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून प्रकल्पातून सांडवा आणि कालव्यांद्वारे सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे तालुक्यातील विहिरींची पाणी पातळी वाढण्यास मदत होत आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या रब्बी हंगामासाठी प्रकल्पांमधील पाणी उपयोगी ठरणार आहे.

साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्याच्या लगत असलेल्या गुजरात राज्याच्या सीमेलगत जोरदार पाऊस झाल्याने पांझरा नदीवरील पांझरा प्रकल्प, जामकी नदीवरील जामखेली प्रकल्प व कान नदीवरील मालनगाव प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पांझरा प्रकल्पाची साठवण क्षमता ही 1200 दशलक्ष घनफूट असून ते पूर्ण क्षमतेने भरले आहे. या प्रकल्पातून उजव्या कालव्याद्वारे आजच्या स्थितीत 70 क्युसेस पाणी सोडले जात असून वेस्ट वेअरद्वारे नदीपात्रात 617 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. जामखेली प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता 400 दशलक्ष घनफूट असून हे धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणातून 30 क्युसेस पाणी उजव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले असून सांडव्याद्वारे नदीपात्रात 148 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. मालनगाव प्रकल्पातून सांडव्याद्वारे कान नदीपात्रात 1090 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. साक्री तालुक्याच्या हद्दीत मात्र धुळे तालुक्याला उपयोगासाठी असलेला अक्कलपाडा प्रकल्पात सुमारे 50 ते 55 टक्के जलसाठा झालेला आहे.

साक्री तालुक्यातील पांझरा नदीवरील लाटीपाडा प्रकल्पातून उजव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले पाणी विटाई गावापर्यंत, व जामखेली प्रकल्पाच्या उजव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले पाणी शेणपूर गावापर्यंत पोहचले असल्याचे शाखा अभियंता एस.बी. हिरे यांनी म्हटले आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत असून या परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे.

माळमाथा, काटवान परिसरात अत्यल्प पाऊस
पिंपळनेरपासून पूर्वेकडील अक्कलपाडापर्यंत तसेच माळमाथा, काटवान परिसरात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पिकांची परिस्थिती नाजूक आहे त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून येत्या आठवडय़ाभरात समाधानकारक पाऊस न पडल्यास पिकांची परिस्थिती बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.