‘किस’ भोवला; पेपॉनवर शो सोडण्याची नामुष्की

सामना ऑनलाईन  । मुंबई 

आसामी गायक पपॉनने चौफेर टिकेनंतर ‘वॉईस ऑफ इंडिया किड्स २०१८’ या रिअॅलिटी शो चे प्रशिक्षक पद सोडले आहे.  पेपॉनने याच शोमधील स्पर्धक असलेल्या अल्पवयीन मुलीचे जबरदस्ती चुंबन घेतले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पेपॉनवर जोरदार टीका झाली होती. तसेच अल्पवयीन मुलीचे जबरदस्ती चुंबन घेतल्याच्या आरोपाखाली पॉक्सो कायद्यांतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे.

पेपॉनने फेसबुक पेजवरुन ही घोषणा केलीय. ‘या प्रकरणानंतर ही व्यवसायिक जबाबदारी पूर्ण करावी अशी माझी मानसिक स्थिती नाही. त्यामुळे मी हे प्रशिक्षक पद सोडत आहे. न्यायालयीन व्यवस्थेवर माझा विश्वास असून यामधील चौकशीनंतर सत्य नक्की बाहेर येईल’ असे पेपॉनने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटले आहे.

यापूर्वी घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पेपॉनने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माफी मागितली होती. तर हा सर्व प्रकार चुकीच्या पद्धतीने रंगवण्यात आल्याचा दावा पेपॉनचे वकील गौरांग नारंग यांनी केला आहे.