विद्यार्थी विमा संरक्षण घ्यावे का?

>>पराग गुप्ता<<

परदेशात पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे हे विद्यार्थी व त्यांचे कुटुंब या दोघांसाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, शिक्षण घेत असताना होणारा इतर खर्च आणि परदेशात राहण्याचा खर्च यासाठी कर्ज काढतात. आज हिंदुस्थानी विद्यार्थी अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, सिंगापूर, रशिया व न्यूझीलंड या देशांमधील विविध क्षेत्रांमध्ये शिक्षण घेत आहेत. परदेशातील नवीन वातावरणात सामाजिकरीत्या व मानसिकरीत्या सामावून जाणे खूपच त्रासदायक ठरू शकते. त्याचबरोबर त्रासदायक प्रकियांमुळे कुटुंबाचे त्यांच्या मुलांना परदेशात तोंड द्याव्या लागणाऱ्या इतर संभाव्य त्रासदायक स्थितीकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यादृष्टिकोनातून विद्यार्थी यात्रा विमा महत्त्वाचा ठरतो.

विद्यार्थी यात्रा विम्याची निवड करताना त्यामध्ये वैद्यकीय व अपघाती विमा संरक्षण समाविष्ट असल्याची खात्री करा. ज्यामुळे तुम्हाला परदेशात महागडय़ा वैद्यकीय उपचारांसाठी खर्च करावा लागणार नाही. डेण्टलसंदर्भात होणाऱ्या खर्चासाठीदेखील कव्हरेज अत्यंत महत्त्वाचे आहे. परदेशात डेण्टल उपचारासाठी पाचपट खर्च होतो. अमेरिका व इतर देशांमध्ये वास्तव्य करत असलेले हिंदुस्थानी वाजवी दरातील डेण्टल उपचारासाठी हिंदुस्थानात येतात.

यात्रा विमा संरक्षणामध्ये चॅरिटेबल भेटी, कायदेविषयक खर्च आणि पासपोर्ट व इतर कागदपत्रे गहाळ होणे/ चोरी होणे अशा घटनांसंदर्भात विमा संरक्षणाची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. व्यापक विमा उत्पादनांमध्ये पासपोर्ट गहाळ होणे, चेक-इन सामानामध्ये होणारा विलंब इत्यादींसाठी विमा संरक्षणाचादेखील समावेश करता येऊ शकतो.

विद्यार्थी यात्रा विमा हा नियमित यात्रा विम्यापेक्षा वेगळा आहे. नियमित यात्रा विमा ट्रिपवर जाणाऱ्या व्यक्तीसाठीच लागू असतो आणि ट्रिप संपताच त्याची मुदत संपते, पण विद्यार्थी यात्रा विमा संपूर्ण ट्रिपदरम्यान आणि संपूर्ण शैक्षणिक सत्रादरम्यान विमाकृत विद्यार्थ्याला विमा संरक्षण देते.

शैक्षणिक संस्थांनादेखील विद्यार्थ्यांसाठी या विमा संरक्षणाचे महत्त्व माहीत आहे. म्हणूनच परदेशातील बहुतेक कॉलेज विद्यार्थ्यांना यात्रा विमा संरक्षणाची सुविधा देतात, पण कदाचित विविध कॉलेजांचा यासंदर्भातील दृष्टिकोन वेगळा असेल.

सामान्य माहिती अशी आहे की, परदेशातील कॉलेज विद्यार्थ्यांना त्यांच्या सेवा प्रदात्यांकडून विमा संरक्षण घेणे अनिवार्य करतात. काही निवडक विद्यापीठांच्या बाबतीत हे खरे असले तरी आणि अनेक प्रख्यात शैक्षणिक संस्थांनी विमा संरक्षण कोणत्या प्रदात्याकडून घ्यावे यासंदर्भात सामान्य मार्गदर्शनाची सुविधा केली असली तरी अखेर कोणते उत्पादन निवडावे याबाबत निर्णय विद्यार्थ्यांना घ्यावाच लागतो. अशा संदर्भात हिंदुस्थानातून परदेशात जाण्यापूर्वी हे विमा संरक्षण करून घ्यावे किंवा आपल्याच देशामधील विमा कंपनीकडून नियमित आरोग्य विमा संरक्षण करून घ्यावे.

आरोग्य विमा संरक्षण अत्यंत व्यापक असल्यामुळे विद्यार्थी यात्रा विमा संरक्षण करणे हेच चांगले ठरेल. तसेच प्रत्येक वेळी परदेशासाठी प्रवास करताना किंवा सुट्टीनिमित्त हिंदुस्थानात येण्यासाठी वेगळ्या यात्रा विमा संरक्षणाची गरज नाही. तुमच्या गरजांनुसार तुम्ही एक किंवा दोन वर्षांसाठी विद्यार्थी यात्रा विमा संरक्षण घेऊ शकता.

सामान्यतः परदेशापेक्षा हिंदुस्थानी विमा कंपनीमधून पॉलिसी घेण्याचा खर्च अधिक परवडणारा असतो. प्रत्येक देशामध्ये वैद्यकीय खर्च वेगळावेगळा आहे. तुम्ही शिक्षणासाठी ज्या देशात जात आहात त्यानुसार पॉलिसीचा हप्ता ठरवला जातो. उदा. अमेरिकेमधील यात्रा व वास्तव्यासाठी घेण्यात आलेली पॉलिसी आफ्रिकेच्या तुलनेत अधिक महागडी असू शकते. कारण या दोन्ही देशांमधील वैद्यकीय खर्च वेगळा आहे. कोलंबिया विद्यापीठ वार्षिक १लाख २९ हजार ४२० रुपयांमध्ये तीन लाख डॉलर्सचा आरोग्य विमा संरक्षण देते तर स्थानिक पातळीवर ४६ हजार ८५१ रुपयांमध्ये पाच लाख डॉलर्सचे विमा संरक्षण मिळू शकते. कॅनडामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटी हेल्थ इन्शुरन्स प्लॅनअंतर्गत (यूएचआयपी) विमा संरक्षण घेण्याचा पर्याय दिला जातो. त्यामधून ४० हजार रुपयांसाठी वार्षिक दहा लाख कॅनेडियन डॉलर्सचे (कॅड) विमा संरक्षण मिळते.

हे पाहता पॉलिसीची निवड करताना फक्त प्रीमियम्सला महत्त्व देऊ नये. आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे उपचार मिळण्यामधील सुलभता. काही प्रदात्यांनी हॉस्पिटलसोबत सहयोग केला आहे. ज्यामुळे पॉलिसीधारक निश्चित नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस वैद्यकीय केअरचा लाभ घेऊ शकतात आणि ही प्रकिया जलद होते. देशातील प्रदात्याच्या माध्यमातून युनिव्हर्सिटी विमा योजनेची निवड करताना ती खरंच अस्तित्वात असल्याची खातरजमा करावी.

प्रत्येक विमा कंपनीमधील क्लेम प्रकियादेखील वेगवेगळी असते. अनेक हिंदुस्थानी विमा कंपन्यांनी परदेशातील आपत्कालीन सहाय्यता सेवा देणाऱ्या कंपन्यांसोबत सहयोग केला आहे. म्हणून क्लेम करण्यासाठी स्वतःच्या देशातील स्थानिक क्रमांकाशी संपर्क साधावा. या प्रकियेची निवड करण्यापूर्वी त्याबाबत माहिती मिळवा.

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी परदेशातील आपत्कालीन वैद्यकीय खर्च, सामान किंवा पासपोर्ट गहाळ होणे अशा बाबींसाठी होणाऱ्या आर्थिक खर्चासाठी संरक्षण करून घेतले पाहिजे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॉलेजमध्ये विमा संरक्षण अनिवार्य आहे की नाही आणि ते आपल्या स्वतःच्या देशातून विमा घेऊ शकतात की नाही याबाबत चौकशी केली पाहिजे.

(लेखक भारती एक्सा जनरल इन्शुरन्सचे चीफ अंडररायटिंग ऑफिसर आहेत.)