आता पाऊस पडल्याशिवाय परळीकरांना नळाला पाणी नाहीच ; वाण धरण पडले कोरडेठाक

142

सामना प्रतिनिधी । परळी वैद्यनाथ

महाराष्ट्रातील दुष्काळाने आता बीड जिल्ह्याला आपल्या घेऱ्यात घेतलेले दिसून येत आहे आहे.परळी तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूर येथील वाण धरण आता कोरडेठाक पडले असून परळी शहराला नगर परिषदेकडून होणारा पाणीपुरवठा आता बंद करण्यात आला आहे. एकंदरीत आता पाणीप्रश्न गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. पाऊस पडल्याशिवाय शहराला पाणीपुरवठा शक्य नसल्याचे सांगितले जात आहे.

तालुक्यातील नागापूर येथील ‘वाण प्रकल्पाची क्षमता 19.71 द.ल.घ.मी.एवढी आहे.आता या प्रकल्पात टक्काभरही पाणी शिल्लक नाही. यामुळे आता परळीकरांसाठी येणारा काळ खडतर आहे. शहरात पाणीकपात नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली होती. आता वाण प्रकल्प कोरडा पडल्याने शहरसाठी पाणी पुरवठा टँकरने होणार आहे. वाण प्रकल्प गेल्या पन्नास वर्षात पहिल्यांदाच कोरडा पडला आहे. पाण्यावरील परळी अशी शहराची ओळख असताना पाणी मानमोकपणाने वापरणाऱ्या परळीकरांची आता अग्निपरीक्षा असल्याची चर्चा होत आहे.

परळी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाण प्रकल्प कोरडा पडल्याने आज पासून शासकीय योजनेतून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.मोठा पाऊस पडेपर्यंत आता वाण प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जाऊ शकणार नाही.शहराला आता टँकरने पाणी पुरवले जाणार असू त्याचा सुयोग्य वापर नागरिकांनी करावा असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा योजनेतून आजपासून पुरवठा बंद, नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा- मुख्याधिकारी,नगर परिषद,परळी वैजनाथ

आपली प्रतिक्रिया द्या