साहेब, वास्तविक अहवाल द्या हो! परळीत केंद्रीय पथकाकडे शेतकऱ्यांची मागणी

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

संपुर्ण मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात गंभीर दुष्काळ पसरला असून.आज तालुक्यातील रेवली येथे दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक पोहचले. या दौऱ्यातून भयावह दुष्काळी परिस्थितीत काही तरी पदरी पडण्याचा आशावाद शेतकरी, नागरीकातून व्यक्त होत आहे.बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक गुरुवार दि.6 डिसेंबर 2018 रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे. या दौऱ्यात हे पथक दुपारी 3 वा.सुमारास रेवली ता. परळी (वै.) येथे आले. पथकाने रेवली येथे भेट देवून पाहणी केली.तसेच काही शेतकरी व नागरिकांशी संवादही साधला. एका ठिकाणी कापसाची पहाणी केली.

या पथकामध्ये निती आयोगाचे सह सल्लागार मनिश चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार एस.सी.शर्मा, ग्रामीण विकास विभागाचे एस.एन. मिश्रा यांच्यासह राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर एमसॅकचे श्री. रांजणकर , जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, परळी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार शरद झाडके, कृषी अधिकारी अशोक सोनवणे, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, तलाठी, मंडळ अधिकारी आदींसह अधिकारी उपस्थित होते.

मराठवाड्यात कापूस हे मुख्य पिक आहे. मागील वर्षी बोंडअळी मुळे शेतकर्‍यांचे संपुर्ण पिक गेले होते.यावर्षी दुष्काळाचे पुन्हा त्यांच्यासमोर नव्याने संकट आले आहे. मागील वर्षीची बोंडअळीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. पावसाअभावी अगोदरच निर्माण झालेल्या जलसंकटामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याची गंभीर स्थिती आहे. खरीप हंगाम असातसाच गेला आता रब्बीचे तर स्वप्नच भंगलेले आहे. अशा भिषण व भयावह परिस्थितीत केंद्रीय पथकाच्या पहाणी दौऱ्यातून तरी काही सकारात्मक व धीर देणाऱ्या बाबी पदरी पडतील का? असा भाबडा आशावाद शेतकरी, शेतमजूर, वंचित, उपेक्षित घटक व्यक्त करीत आहे.

साहेब वास्तविक आहवाल द्या हो
राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकारने केलेल्या पहिल्या पाहणीच्या आधारे प्राप्त अहवालानुसार गंभीर दुष्काळ असल्याचे निदर्शनास आले.या मध्ये बीड जिल्हयातील सर्वच तालुक्यांचा समावेश आहे. मात्र दुष्काळी भागातील जनता,शेतकरी, व नागरीकांच्या वस्तुस्थिती दर्शक मतांचा व मागण्यांचा सरकारने विचार करणे गरजेचे आहे. यावेळचा अभूतपूर्व दुष्काळ असल्याने हेक्टरी ५० हजार रू. मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरू लागली आहे. साहेब, आम्ही दुष्काळी परिस्थितीने उद्ध्वस्त झालो असून मायबाप सरकारला वास्तविक आहवाल द्या हो अशी विनवणी उपस्थित शेतकरी, नागरीकांनी या पथकाला केली.