परळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

देशातच नव्हे तर जगभरात आपल्या कामातून ओळख निर्माण करणारे देशाचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची रोडकरी म्हणून असलेली प्रतिमा परळी-पिंपळा(धायगुडा) या रस्त्याच्या कामामुळे चांगलाच धक्का पोचण्याची शक्यता आहे. 134.45 कोटी रुपये खर्च करून होत असलेला हा रस्त्याचा कामाचा अर्ध्यापेक्षा जास्त कालावधी उलटूनही या रस्त्याचे एक इंचही काम न झाल्याने आता नागरिकच येत्या 25 तारखेला या रस्त्यावरच रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन त्यांनी संबंधित कार्यालयाकडे दिले आहे.

पूर्वीचा राज्य रस्ता क्र.64 आताचा 548 – ब राष्ट्रीय महामार्ग परळी – पिंपळा (धायगुडा) या रस्त्याचे कामाची सुरुवात गेल्या वर्षी सुरू झाले होते. 18.3 किमीच्या रस्त्यासाठी 134 कोटी 45 लाख इतक्या किमतीचे हे काम होते. हे काम 24 महिन्यात पूर्ण करायचे आहे. हे काम सुरू होऊन दीड वर्ष उलटूनही एक इंचही रस्ता पूर्ण झालेला दिसत नाही. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची तसेच प्रवाशांची मोठी हेळसांडच होत आहे. दोन्ही बाजूने उकरून ठेवलेला रस्ता याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या वतीने 25 नोव्हेंबरला रास्ता रोको करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामामुळे अपघातासह श्वसनाचे आजार होत असल्याचे या निवेदनात सांगितले गेले आहे. तसेच या रस्त्याचे काम त्वरित सुरू व्हावे,या रस्त्यावरील अपघातग्रस्तांना प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी,गुत्तेदारावर कारवाई करावी अशा मागण्या या निवेदनद्वारे करण्यात आल्या आहेत.

रस्त्याच्या कामासाठी कृती समिती स्थापन होण्याची पहिलीच वेळ
दरम्यान रस्त्याच्या अर्धवट रखडलेल्या कामविरुद्ध कृती समिती स्थापन होण्याची ही पहिलीच वेळ असून 18.3 कि.मी.चा रस्ता हा परळीसह परिसरातील जनतेसाठी आता अस्मितेचा मुद्दा झाला आहे. या समितीने शंकर पार्वती नगर,बँक कॉलनी,कन्हेरवाडी सह रस्त्यावरील अनेक गावात बैठका झाल्या आहेत.हे रास्तारोको आंदोलन परळीत तर होणार आहेत शिवाय रस्त्याचे दुसरे टोक असलेले पिंपळा धायगुडा येथेही आंदोलन होणार आहे. रस्त्याचा सर्व प्रकार आंदोलानाने मार्गी लागणार का हा प्रश्न आहे?

प्रशासनाचे दुर्लक्ष
आत्तापर्यंत या रस्त्यावर शेकडो दुचाकीचे अपघात झाले असून,दोन बसचेही अपघात झालेले आहेत.या रस्त्याचे सुरू असलेले कामाबाबत कुठेही सूचना फलक लावल्याचे दिसून येत नाही.अंबाजोगाई शिक्षणासाठी जा-ये करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे असल्याने या रस्त्याला मोठे महत्व आहे. कामाचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ उलटूनही हा रस्ता एक इंचही झालेला दिसत नाही. परळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत प्रसिद्ध असलेले कार्यकारी अभियंता एस.बी.काकड यांना याबाबात माहिती विचारली असता या कामाचा माझा कुठलाही संबंध नसल्याचे ते नेहमीच सांगतात.