दलित महिलेला शाळेत मध्यान्ह भोजन बनवण्यापासून पालकांनी रोखले

75

सामना ऑनलाईन । तिरुपूर

तमिळनाडूतील तिरूपूर मध्ये एका दलित महिला शाळेतील मध्यान्ह भोजन बनवत असल्याने पालकांनी विरोध दर्शवला आहे. तसेच या महिलेला कामावरून न काढल्यास शाळेचे कामकाज बंद करण्याची धमकीही या पालकांनी दिली आहे.

पी पप्पल ही महिला अरुंथथियार या दलित समाजाची आहे. सदर महिला २००६ साली मध्यान्ह भोजनाच्या योजनेत रुजू झाली. पप्पल यांनी केलेल्या विनंतीनुसार ३० जून रोजी त्यांची बदली त्यांच्याच गावातील एका सरकारी शाळेत करण्यात आली. पण तिथल्या पालकांना जेव्हा कळाले की या शाळेतील मध्यान्ह भोजन एक दलित महिला करत आहे, तेव्हा त्यांनी विरोध दर्शवला. तसेच या महिलेला स्वयंपाक बनवण्याच्या कामातून नाही काढले तर शाळेचे कामकाज बंद पाडू अशी धमकीही त्यांनी दिली. पालकांच्या दबावापुढे झुकत विभाग विकास अधिकार्‍याने पप्पलच्या बदलीचा आदेश रद्द केला. नंतर काही दलित समाजाच्या लोकांनी निदर्शने केल्यानंतर हे प्रकरण जिल्हाधिकार्‍यांकडे गेले. तिरुपूरचे जिल्हाधिकारी श्रवण कुमार यांनी पिडीत महिलेला त्याच शाळेत काम करण्याचे आदेश दिले. तसेच गौंदर समाजाच्या ७५ महिला आणि पूरूष ज्यांनी या महिलेला विरोध केला होता त्यांच्याविरूद्ध एफआयर दाखल करण्यात आला.

दशाळेच्या मुख्याध्यापिका शशीकला यावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की “शाळेत एकूण ७५ विद्यार्थी आहे त्यापैकी २९ विद्यार्थ्यांच्या पालकांनी पप्पल विरोधात तक्रार केली आणि तिची बदली दुसर्‍या शाळेत करण्यास सांगितले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या सुटीचा अर्ज दिला आणि आपल्या पाल्यांना घरी घेऊन गेले. गुरूवारी याच पालकांनी शाळा उघडू दिली नाही आणि पप्पलला जोरदार विरोध दर्शवला. त्यानंतर आम्ही विभागीय विकास अधिकार्‍यांना ही बाब कळवली.”

पप्पलचे पती पलानिसामी यांनी हा भेद नवा नसल्याचे सांगितले, तसेच २००६  साली जेव्हा पप्पल ज्या शाळेत रूजू झाली तेव्हाही तिला या जातीभेदचा सामना करावा लागला होता असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

हाच जातिभेद आधीच्या शाळेत होता तो टाळण्यासाठी पप्पलने बदलीसाठी अर्ज केला होता. पण नव्याने बदली झालेल्या शाळेत त्यांना जातिभेदाला समोरे जावे लागले. गौंदर समाजाच्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की “आम्हाला पप्पल या महिलेला विरोध आहे, दुसर्‍या गावाच्या दलित महिलेने हे काम केल्यास आमचा विरोध नसणार.”

आपली प्रतिक्रिया द्या