मुंबईच्या ४४० रस्त्यांवर पार्किंगमाफियांचे राज्य, शिवसेनेने केला भांडाफोड

सामना प्रतिनिधी, मुंबई

शहर आणि उपनगरातील तब्बल ४४० रस्त्यांवर पार्किंगमाफियांचेच राज्य सुरू आहे. सहाय्यक आयुक्तांनी आपल्या अधिकारात पार्किंगची कंत्राटे दिली असून त्यात वाहनमालकांची लुटमार सुरू असल्याचे आज शिवसेनेने उघडकीस आणले. शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी याबाबतचा हरकतीचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाच्या ही बाब लक्षात आणून दिली.

प्रभागांमध्ये पे ऍण्ड पार्किंगची सुविधा निर्माण करून देण्याचे अधिकार सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी ४४० रस्त्यांवर पार्किंगसाठी परवानगी दिली आहे. त्यावर सर्रास पार्किंगसाठी पावती फाडण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती शीतल म्हात्रे यांनी विधी समितीमध्ये हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे दिली. शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी आज विधी समितीत पार्किंगमाफियांचा मुद्दा उपस्थित केला. शहरातील ४४० रस्त्यांवर पे ऍण्ड पार्क सुरू करण्यात आले आहेत. त्याचे अधिकार प्रत्येक विभागातील सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहे, मात्र या पार्किंगचे नियंत्रण कोणामार्फत ठेवले जाते हेच समजत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पार्किंगचे फलक लावलेले नसतात. अशा ठिकाणी वाहने उभी करून त्यांच्याकडून हवे तेवढे शुल्क आकारले जाते, असा आरोपही त्यांनी केला.

कंत्राटाची चौकशी केली जावी!
नगरसेवकांना छोटेसे काम करायचे असले तरी त्याकरिता ई-निविदा काढाव्या लागतात. मात्र आयुक्तांनी ही कंत्राटे कोणाला कशी दिली, याचे दरपत्रक काय याची माहिती द्यावी, अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी केली. या मुद्दय़ाला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. यावर समितीचे अध्यक्ष सुहास वाडकर यांनी याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.