कर्मचाऱ्यांच्या करमुक्त ग्रॅज्युईटीची मर्यादा वाढवली

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणारी २० लाखांपर्यंतची ग्रॅज्युईटी करमुक्त असणार आहे. ग्रॅच्युईटीबाबतचा हा महत्त्वाचा निर्णय गुरुवारी संसदेत घेण्यात आला. संसदेकडून ‘पेमेंट ऑफ ग्रॅज्युईटी’ कायद्यात सुधारणा सुचविणाऱ्या विधेयकाला मंजूरी देण्यात आली. या विधेयकाच्या मंजुरीनंतर करमुक्त ग्रॅज्युईटीची मर्यादा १० लाखांवरून २० लाखांवर पोहोचली आहे.

ग्रॅज्युईटीबाबच्या या निर्णयामुळे खासगी क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. ज्या कर्मचाऱ्याचा पगार जास्त आहे, त्या कर्मचाऱ्यांना याचा जास्त फायदा होणार आहे. गेल्या आठवड्यात लोकसभेत मंजूर झालेलं हे विधेयक गुरुवारी राज्यसभेतही मंजुर झालं.

कर्मचाऱ्याने एखाद्या कंपनीत पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या मालकाकडून कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी दिली जाते. ग्रॅज्युईटीची ही रक्कम निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी दिली जाते. याआधी इन्कम टॅक्स कायद्यातंर्गत ग्रॅज्युईटीवरील १० लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त होती.