पारनेरमध्ये शाळकरी मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱया आरोपींना फाशी

सामना ऑनलाईन । नगर

नगर जिह्यातील पारनेर तालुक्यात तीन वर्षांपूर्वी एका शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करणाऱया तीन आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने आज मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. तसेच प्रत्येकी 50 हजार रुपये दंडही ठोठावला गेला. दंडातील एक लाख रुपये रक्कम पीडित कुटुंबाला द्यावे लागणार असून ५० हजार रुपये सरकारकडे जमा करावे लागणार आहेत.

२२ ऑगस्ट २०१४ रोजी पारनेरच्या लोणी मावळा गावात ही घटना घडली होती. ही शाळकरी मुलगी घरी जात असताना संतोष विष्णू लोणकर (३५), मंगेश दत्तात्रय लोणकर (३०) आणि दत्तात्रय शिंदे (२७) या तिघांनी तिला रस्त्यावरील चारीच्या पुलाखाली ओढून आळीपाळीने अत्याचार केला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मुलीच्या नाकातोंडात चिखल कोंबला होता. त्यामुळे गुदमरून तिचा मृत्यू झाला होता. आरोपींनी त्या मुलीच्या शरीरावर क्रू ड्रायव्हरने जखमाही केल्या होत्या.

या खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने ३२ साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी आरोपींना मृत्युदंड ठोठावण्यात यावा अशी मागणी केली होती. गुह्यात वापरलेली दुचाकी, वस्तू विकून रक्कम सरकारजमा केली जाईल असा आदेशही देण्यात आला आहे. लोणी मावळा व परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी या खटल्याचा अंतिम निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात गर्दी केली होती.

घटनाक्रम
– २२ ऑगस्ट २०१४ रोजी घटना घडली.
– १५ दिवसांत आरोपींना अटक.
– ११ नोव्हेंबर २०१४ रोजी दोषारोपपत्र दाखल.
– १ सप्टेंबर २०१५ रोजी सुनावणीला सुरुवात.
– ७ जुलै २०१७ रोजी सुनावणी पूर्ण. ३२ साक्षीदार तपासले. २४ परिस्थितीजन्य पुरावे.
– नोव्हेंबर २०१७ रोजी आरोपींवर दोषारोप सिद्ध.
– ११ नोव्हेंबर २०१७ रोजी आरोपींना शिक्षा.

– न्यायालयाच्या बाहेर आज सकाळपासूनच मोठी गर्दी जमली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष पोलीस बंदोबस्त न्यायालयाच्या आवारात तैनात करण्यात आला होता. आरोपींना सकाळीच न्यायालयात हजर केले होते. शिक्षा झाल्यानंतर आरोपींच्या नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला होता. एका आरोपीचा मुलगा १०-१२ वर्षांचा असून तोसुद्धा बाजूला बसून मोठमोठय़ाने रडत होता.