‘फेसबुक’वर हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे घोर विडंबन!

सामना प्रतिनिधी । गोवा

कठुआ आणि उन्नाव येथील प्रकरणाचे निमित्त करून काही समाजविघातक प्रवृत्ती देशभरात जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करून जनभावना प्रक्षुब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पटाब्मी (केरळ) येथील एका महाविद्यालयाच्या निवृत्त प्रा. दुर्गा मालती यांनी स्वतःच्या फेसबुक खात्यावर भगवान शिव आणि शिवाचे त्रिशुल यांना पुरूषाच्या लिंगाच्या स्वरूपात दाखवणारी अनेक आक्षेपार्ह अन् प्रक्षोभक चित्रे प्रसारित करून कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या वतीने आज गोवा येथे सौ. राजश्री गडेकर यांनी गोवा सायबर विभागात तक्रार नोंदवली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की, प्रा. मालती यांना हिंदूंच्या धार्मिक भावना आणि श्रद्धास्थाने चांगल्या प्रकारे ज्ञात असतांनाही एक विशिष्ट अंतस्थ हेतु डोळ्यासमोर ठेवून त्यांनी देशभरातील कोट्यवधी लोकांपर्यंत ही चित्रे जाणीवपूर्वक प्रसारित केली आहेत. यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासह त्यांचा घोर अवमानही करण्यात आला आहे. ही चित्रे सामाजिक सलोखा बिघडवणारी आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवणारी असल्याने तातडीने प्रा. मालती यांच्या फेसबुक खात्यावर बंदी आणावी, त्यांच्यावर भा.दं.वि. संहितेच्या कलम २९५ (अ) आणि १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रणरागिणी शाखेने केली आहे. हिंदुबहुल हिंदुस्थानात अशा प्रकारे देवतांचे विडंबन कधीही सहन केले जाणार नाही. पोलिसांनी या प्रकरणी जर दखल घेतली नाही, तर याविरोधात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राजश्री गडेकर यांनी या वेळी दिला.