पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ बंदमध्ये सहभागी व्हा – आ. आनंदराव पाटील

सामना प्रतिनिधी । कराड

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रीय काँग्रेसने सोमवार, 10 सप्टेंबरला देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे. या बंदमध्ये सातारा जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिकांसह सर्व लोकांनी सहभागी होत कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

पेट्रोल व डिझेलच्या किंमती फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे. मात्र त्यानंतरही केंद्र सरकार तसेच राज्य शासन कोणतीही कार्यवाही करत नाही. 2014 साली केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर शासनाने पेट्रोलच्या दरात 211 टक्के तसेच डिझेलच्या दरात 443 टक्के वाढ केलेली आहे. अवास्तव कर लावल्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढलेल्या आहेत, असा दावाही आ. पाटील यांनी केला आहे.

सर्वसामान्यांची अक्षरश: लूट सुरू असून अन्याय होत आहे. याविरोधात सोमवारी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सर्वसामान्य जनता, व्यापारी व शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे. हा बंद यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनता व व्यापार्‍यांनी शासनाच्या इंधन दरवाढ धोरणाचा निषेध नोंदवावा, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.