नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी शरद पवारांना गळ घालणार

18
शरद पवार – 1) 18 जुलै, 1978 ते 17 फेब्रुवारी, 1980 (पुलोद), 2) 26 जून, 1988 ते 25 जून 1991 (काँग्रेस), 3) 6 मार्च, 1993 ते 14 मार्च, 1995 (काँग्रेस)


सामना प्रतिनिधी । जामखेड

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळ पवार यांची भेट घेऊन त्यांना याबाबत गळ घालणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी दिली. नगर जिल्ह्यामध्ये शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा फार मोठा वर्ग आहे. जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांशी पवार यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी नगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढवावी अशी जिल्ह्यातील सर्वच नेत्यांची व अनेक लोकांची इच्छा आहे.

पवार नगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढविणार अशी घोषणा झाल्यास जिल्ह्यामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण होईल. तसेच त्यामुळे जिल्ह्यामध्ये पक्षाची ताकद वाढेल व जिल्हा राष्ट्रवादीमय होईल, त्याचा लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीसाठीही पक्षाला फायदा होईल. पवार यांच्या मतदारसंघातील उमेदवारीमुळे मतदारसंघाचे नाव देशात जाईल. एवढेच नव्हे तर मतदारसंघाला देशाचे नेतृत्व करण्याची संधीही मिळू शकते. विकासापासून वंचित राहिलेल्या नगर दक्षिणच्या विकासाला नवी चालना मिळेल आणि जिल्ह्यातील बहुतांशी प्रश्न मार्गी लागतील, त्यामुळे हे शिष्टमंडळ पवार यांना विनंती करणार आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर चर्चा सुरू असून लवकरच दत्तात्रय वारे, पक्ष निरीक्षक किशोर मासाळ, शरद भोरे यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह पवार यांची भेट घेऊन त्यांना गळ घालण्यात येणार असल्याचे कोठारी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या