अभिवाचनाचा अभिनव  प्रयोग

परवा आमचा पोपट वारलाया एकपात्री नाटकात मध्यमवर्गीय मानसिकता उपहासात्मकपणे दाखवण्यात आली आहे.

कुटुंब, नाती, समाजव्यवस्था, धर्म या बाबींशी व्यक्ति भावनिकदृष्टय़ा जोडलेली असते. असाच भावनेच्या आधारावर जोडले गेलेला एक सजीव पोपट… त्याच्या मृत्यूआधी आणि नंतर आलेल्या अनुभवांची हलकीफुलकी गोष्ट ‘परवा आमचा पोपट वारला’ या उपहासात्मक एकपात्री नाटकात गुंफण्यात आली आहे. आसक्त कलामंचाच्या प्रायोगिक रंगभूमीवरील या नाटकाच्या अभिवाचनाचे प्रयोगही सध्या सादर होत आहेत.

डॉ. चंद्रशेखर फणसळकर लिखित या नाटकात मध्यमवर्गीय मानसिकता आणि त्यातील समर्पक विनोद गोष्ट स्वरूपात मांडण्यात आले आहेत.  वैचारिक पातळीवरचे समज, भाबडेपणा आणि विसंगती यामधून निरनिराळ्या पात्रांची उकल या नाटकात करण्यात आलीय. गोष्ट सांगणाऱया एका मध्यमवर्गीय निवेदकाचा पाळलेला पोपट मरतो. मग पोपट जिवंत असताना, आजारी असताना आणि मेल्यानंतर आलेले नानाविध व्यक्तिंचे अनुभव निवेदक सांगत जातो. त्यानंतर प्रत्येक प्रसंग हसवताना प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. हलकाफुलका विषय जगण्याच्या  वेगवेगळ्या पातळ्यांवरील घटनांमध्ये बांधण्यात आला आहे, असे फणसळकर सांगतात.

रसिकांना हे नाटक आपलंसं वाटतं. त्याविषयी बोलताना ते म्हणतात, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, आध्यात्मिक आणि व्यवहारी प्रश्न एकमेकांशी सुसंगत असले तरी असले तरी मध्यमवर्गीय मानसिकता विसंगतीत अडकते. सारासार विचार न करता भावनेच्या,  ढोंगी परंपरेच्या प्रभावाखाली गुरफटते. सर्वसामान्य माणूस परिस्थितीला कसा बळी पडतो, तसेच सुख-दुःखाच्या चौकटीत अडकलेला निवेदक आणि त्याचा वारलेला पोपट प्रेक्षकांना विचारांच्या दृष्टिने भानावर आणायला या नाटकाच्या माध्यमातून मदत करतील.

रोजच्या जगण्यातील, सद्यस्थितीतील अनेक प्रसंग विनोदाच्या अंगाने रंगवलेले प्रेक्षकांना या नाटकात पाहायला मिळतात. सभोवताली घडणाऱया घटनांविषयी बोलायला जावं तर त्या आधीच समाजापर्यंत पोहोचलेल्या असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरातच घडलेल्या घटना प्रत्यक्ष या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळतात. त्यामध्ये विनोद असला तरीही त्याला कारुण्याची झालर आहे, याची जाणीव प्रेक्षकांना करून देणारं हे नाटक आहे.

पोपट आख्यान…

या स्तरांवरील श्रद्धा आणि त्यातून निर्माण होणारा निखळ विनोद यावर ‘परवा आमचा पोपट वारला’ या नाटकाचे सादरीकरण पुढे सरकत जाते.एक पोपट रोजच्या जगण्यातले नानाविध अनुभव लोकांसमोर मांडतं. या अनुभवांनी माणसाचं आयुष्य कसं व्यापलंय? माणसाचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ ढोंगी आणि बाजारू रुढींनी कसा व्यापलाय? यामुळे विज्ञानविषयक विचार व्यक्ति कसे पचवू शकत नाही, यावर भाष्य करणारं… विवेकी माणसाला सारासार विचार करण्यास प्रवृत्त करणारं हे नाटक आहे. तसेच आधुनिक काळातल्या काही पटत असल्या तरी मनाला चिकटलेल्या विचारांकडे दुर्लक्ष केलं जातंच. त्यामुळे रसिकांना गुंतवून ठेवणारं हे नाटक आहे, असे त्यांचं म्हणणं आहे.