पतंजलीच्या उत्पादनांना टक्कर देणार श्री श्री रविशंकर यांची उत्पादने

सामना ऑनलाईन । मुंबई

रिटेल अर्थात ग्राहकाभिमुख किरकोळी विक्रीच्या बाजारात योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजलीने स्वतःचे मोठे साम्राज्य निर्माण केले आहे. या साम्राज्याला श्री श्री रवीशंकर यांच्या श्री श्री तत्व या आयुर्वेदिक उत्पादनांकडून आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर आपली आयुर्वेदिक उत्पादने एक हजार दुकानांमधून विकणार आहेत. या उत्पादनांमध्ये टूथपेस्ट, साबण, तूप आणि बिस्किटांसह अनेक दैनंदिन उपयोगाच्या वस्तू आहेत.

लोकांना परवडणाऱ्या दरात दैनंदिन वापराच्या दर्जेदार वस्तू हव्या असतात. लोकांची ही गरज ओळखून श्री श्री तत्व मोठ्या प्रमाणावर अशा वस्तूंची निर्मिती आणि विक्री करत असल्याची माहिती श्री श्री आयुर्वेद (एसएसए) ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेज कटपीटिया यांनी दिली. श्री श्री आयुर्वेद ‘श्री श्री तत्व’ नावाने दुकानांची मोठी साखळी तयार करत आहे. या दुकानांमधून आमची उत्पादने खरेदी करणे लोकांना सहज शक्य होईल, असेही ते म्हणाले.

कंपनी २००३ पासूनच आरोग्यदायी पेय, साबण, मसाले खाद्यपदार्थ, इतर घरगुती उत्पादने अशा अनेक वस्तू तयार करत आहे. लवकरच ३०० उत्पादनांची कंपनीच्या ३ कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणावर निर्मिती सुरू होणार आहे, असे तेज कटपीटिया यांनी सांगितले.