कर्ज फेडा किंवा कंपनी विका!: जेटली

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशातील बँकांचे कर्ज थकवणाऱ्या खासगी कंपन्यांना गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इशारा दिला. कर्ज फेडा किंवा कंपनी विका असे ते म्हणाले.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी वटहुकूम काढून रिझर्व्ह बँकेला ५०० कोटींपेक्षा जास्त थकीत कर्ज असणाऱ्या १२ कंपन्यांवर दिवाळखोर संहितेनुसार कारवाई करण्याची परवानगी दिली आहे. या निमित्ताने हिंदुस्थानात पहिल्यांदाच दिवाळखोर संहिता मोठ्या प्रमाणावर अमलात येणार आहे, अशी माहिती जेटली यांनी दिली.

खासगी कंपन्यांना थकीत कर्ज फेडता येत नसेल तर त्यांनी कंपनी विकावी आणि दुसऱ्याला यात हस्तक्षेप करु द्यावा असा इशाराच जेटलींनी दिला. केंद्र सरकारने आत्तापर्यंत बँकांना ७० हजार कोटींचे भांडवल उपलब्ध करुन दिले असेही जेटली म्हणाले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणाचेही जेटलींनी समर्थन केले. देशात भक्कम आर्थिक स्थितीत असलेल्या ५-६ बँका असाव्यात, अशी आमची भूमिका असल्याचे जेटली म्हणाले.