ईडीकडून पेटीएमची कोणत्‍याही प्रकारची चौकशी नाही, पेटीएमचा दावा

आपल्या कंपनीची सक्तवसुली संचालनालयाने कोणतीही चौकशी केलेली नाही, असा दावा पेटीएमने केला आहे. पेटीएमची मातृसंस्था असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स कंपनी, पेटीएम किंवा त्यांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी विजय शेखर वर्मा यांच्याविरोधात कोणतीही ईडी चौकशी सुरू नसल्याचा दावा पेटीएमने केला आहे.

दरम्यान, वित्त मंत्रालयाचे सचिव संजय मल्होत्रा यांनीही सध्या पेटीएमविरोधात कुठलाही तपास सुरू नसल्याचं म्हटलं आहे. पण, जर कंपनीविरोधात तक्रारी आल्या तर चौकशी केली जाईल. वास्तविक ईडीने सप्टेंबर 2022 मध्ये रेझरपे आणि पेटीएमसह अन्य अन्य काही कंपन्यांच्या कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. पण या धाडी त्यांच्या माध्यमातून व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात टाकण्यात आल्या होत्या. त्यांच्यावर पैश्यांच्या अफरातफरीचे आरोप होते.

मात्र, रविवारपासून पेटीएम आपल्यावरील आरोपांचं खंडन करत असून ईडीने आपल्याविरोधात कुठलाही तपास सुरू केलेला नसल्याचं पेटीएमचं म्हणणं आहे. पेटीएम किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही कंपनीचा मनी लाँडरिंगसारख्या आरोपांचा काही संबंध नसल्याचा दावा पेटीएमने केला आहे.