…जेव्हा मोर विहिरीमध्ये पडतो

राजेंद्र वाडेकर । राहुरी

भक्षाच्या शोधात जलकुंभात खोलवर अडकलेल्या मोराला उदय साबळे या शेतकऱ्याने सलामत बाहेर काढुन नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. तालुक्यातील रामपुर येथील उदय साबळे यांच्या शेतात रविवारी दुपारी ही घटना घडली. भक्षाच्या शोधार्थ भटकंती करणा-या मोराने साबळे यांच्या शेतीतील २५ फूट खोलीच्या जलकुंभात प्रवेश केला होता. मात्र भक्षाचे सावज केल्यानंतर बाहेर पडणे मुश्किल झाल्याने गेल्या २ दिवसांपासुन मोराचा मुक्काम जलकुंभातच राहिला.

जलकुंभात जेरबंद झालेल्या या मोराची बाहेर पडण्यासाठी मोठी धडपड केली. मात्र ती व्यर्थ ठरली. रविवारी दुपारी शेतकरी उदय साबळे विहीरीवर मोटरपंप चालु करण्यासाठी आले असता जिवाचा आकांत करणारा मोर पाईपमध्ये अडकल्याचे त्यांच्या नजरेस पडले. साबळे यांनी या घटनेची खबर वनविभागाला देऊन वन कर्मचा-याला घटनास्थळी पाचारण केले.

पाईपमध्ये मोर अडकल्याची माहिती वा-यासारखी परिसरात पसल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. साबळे यांनी पाईपमध्ये उतरून मोराच्या पायाला दोर बांधुन सही सलामत बाहेर काढले. सिमेंट पाईपातुन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात या मोराच्या पंखाजवळ जखमा झाल्या होत्या. जखमी मोरावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने उपचार केले.

तालुक्याच्या पश्चिम भागातील ताहराबाद, म्हैसगाव, रामपुर, कणगर परिसरात मोरांची संख्या मोठी आहे. मात्र वनविभागाकडुन पाणवठ्याची सोय नसल्याने पाण्याचा शोधार्थ मोरांची भटकंती सुरू आहे.